परभणी जिल्हा : ३२ लाख वृक्षांची होणार लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:26 AM2018-05-04T00:26:45+5:302018-05-04T00:26:45+5:30
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ १ जुलै रोजी जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षरोपण मोहीम राबविली जाणार आहे़ यासाठी २५ लाख १७ हजार ६०४ रोपे उपलब्ध झाली आहेत़
राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे़ या अंतर्गत २०१६ यावर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजना राबविली़ यामध्ये परभणी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़
त्यानुसार १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणी वृक्षांची लागवड केली़ त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ या दोन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे़
२०१७ च्या पावसाळ्यामध्ये राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले़ या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ७ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध विभागांनी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले़
२०१८ या वर्षासाठी जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़
यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशू संवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, गृह (कारागृह) ३ हजार, उर्जा विभाग ४० हजार ५००, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वन विभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ हजार ८३९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास व उद्योजकता (आयटीआय) ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्ह्याला एकूण ३२ लाख ४० हजार ८ चे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ हे उद्दिष्ट संबंधित विभाग पूर्ण करतात की कागदावरच वृक्षारोपण करून उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दिखावा करतात? याकडे संबंधित विभागांनी कटाक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे़