परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:11 AM2018-06-10T00:11:07+5:302018-06-10T00:11:07+5:30
२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़
यावर्षी जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले होते़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी साप जमिनीमध्ये वारूळ करतात़ आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे़ या पावसामुळे साप शेतशिवारात सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी वारुळाच्या बाहेर येतात. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकरी शेती काम करीत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना सर्पदर्शनही होते़
काही वेळा नजरचुकीने शेतकºयांना सर्पदंश होतो़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला वसाहतींमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते. मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात असे ४१२ रुग्ण दाखल झाले होते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या ४१२ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांवरच उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.
एका महिन्यात
२४ जणांना सर्पदंश
जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते़ २०१७-१८ या वर्षांत ४१२ नागरिकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये तब्बल २४ जणांना सर्पदंश झाला होता. या रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले़ त्यामुळे सर्पदंश झालेले २४ नागरिकांना जीवदान मिळाले आहे़