परभणी जिल्हा : ७९ विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:44 AM2018-04-17T00:44:19+5:302018-04-17T00:44:19+5:30
जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका यावर्षी सहन करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांना शेतशिवारांमधून पाणी आणावे लागत आहे. पालम, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू या तालुक्यांमध्ये पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरु केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करुन हे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करुन दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गंगाखेड तालुक्यामध्ये विहीर अधिग्रहणासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. पालम तालुक्यामध्ये १७, पूर्णा १६, जिंतूर ११, सेलू १, पाथरी २ आणि मानवत तालुक्यात एका गावात विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी आणि सोनपेठ या दोन तालुक्यातून एकही प्रस्ताव अधिग्रहणासाठी दाखल झाला नाही, हे विशेष. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत चालली असून विहीर अधिग्रहणाबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करुन देत आहे.
अधिग्रहणाची ११४ प्रकरणे प्रलंबित
विहीर अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतस्तरावरुन दाखल झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी ११४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यात गंगाखेड तालुक्यात ५४, पालम तालुक्यात ३१, पूर्णा ८, जिंतूर १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रस्तावांपैकी गंगाखेड तालुक्यातील २१ प्रस्ताव गटविकास अधिकारीस्तरावर तर ३३ प्रस्ताव तहसीलदारांच्या स्तरावर प्रलंबित आहेत.
पालम तालुक्यातील ३१ प्रलंबित प्रस्तावांपैकी गटविकास अधिकारी स्तरावर २० आणि तहसील स्तरावर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. पूर्णा तालुक्यात ८ प्रस्ताव प्रलंबित असून त्यातील ५ गटविकास अधिकारी स्तरावर तर ३ तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. जिंतूर तालुक्यातील १० आणि सेलू तालुक्यातील ११ प्रस्ताव गटविकास अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत. गटविकास अधिकाºयांकडे एकूण ६७ प्रस्ताव प्रलंबित असून तहसीलस्तरावर प्रलंबित प्रस्तावांची संख्या ४७ एवढी आहे.
१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १६ गावांना टँकरचे पाणी दिले जात आहे. त्यात गंगाखेड तालुक्यामध्ये खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा या चार गावांमध्ये टँकर सुरु झाले आहे. पालम तालुक्यात रामापूर व रामापूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी या गावांमध्ये ६ टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्यात नाव्हा येथे दोन तर चाटोरी येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्णा तालुक्यात ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून त्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई-लासिना, लोण खु. आणि आहेरवाडी या गावांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यात मांडवा या गावात टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.