परभणी जिल्ह्यात २ लाख हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:47 AM2017-12-18T00:47:15+5:302017-12-18T00:47:21+5:30
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तयार केला असून त्यात ही माहिती नमूद केली आहे. विशेष म्हणजे, प्रादुर्भावग्रस्त २१ हजार २९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत.
मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तयार केला असून त्यात ही माहिती नमूद केली आहे. विशेष म्हणजे, प्रादुर्भावग्रस्त २१ हजार २९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापसाची लागवड झाली. प्रस्तावित क्षेत्रापैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी कापूस लागवडीकडे वळाले होते. इतर पिकांच्या तुलनेत जिल्ह्यात कापसाची लागवड सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या सर्व आशा या पिकांवर होत्या. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्यानंतर सुरुवातीला सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची काढणी झाली. त्या पाठोपाठ कापसाचीही वेचणी करण्यास शेतकºयांनी सुरुवात केली. खरीप हंगामातील हा शेवटचा टप्पा होता. जिल्हाभरातील बहुतांश शेतकºयांची वेचणी पूर्ण झाल्यानंतर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू लागला. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकºयांनी विविध प्रयत्न केले. मात्र ही अळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली.
बोंडअडळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे तक्रारी दाखल होत गेल्या. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले. तक्रारीचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रारी दाखल करुन घेण्यात आल्या आणि आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहेत.
याच दरम्यानच्या काळात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बोंडअळीच्या प्रादूर्भावाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यात लागवड झालेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवरील कापूस पिकापैकी सर्वच्या सर्व क्षेत्र या अळीने वेढले आहे. त्यामुळे १०० टक्के पीक प्रादूर्भावग्रस्त असल्याचेच यावरुन दिसत आहे.
यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी पिकांचे उत्पादन बºयापैकी होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र, शेतकºयांना यावर्षीही नुकसान सहन करावे लागत आहे.
सोयाबिनचे उत्पादन चांगले झाले परंतु सोयाबिनला हमी भाव मिळाला नाही. तर दुसरीकडे कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. दोन्ही नगदी पिकांनी धोका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची ही परिस्थिती लक्षात घेता कापसाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
१०० टक्के क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त
कृषी विभागाने बीटी कापसावर झालेल्या अळीच्या प्रादूर्भावाचे सर्व्हेक्षण केले असून त्यात आर्थिक नुकसानीच्या पातळीमध्ये (ईटीएल) पिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तेव्हा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व क्षेत्र प्रादूर्भावग्रस्त असल्याचे या विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार परभणी तालुक्यात ३४ हजार ४१७ हेक्टर, गंगाखेड १६ हजार ८९०, पाथरी २३ हजार ५४०, जिंतूर २५ हजार ३८१, पूर्णा ११ हजार ४७१, पालम १२ हजार ७९१, सेलू २९ हजार ६४३, सोनपेठ १७ हजार ४० आणि मानवत तालुक्यातील २० हजार ५५६ हेक्टर कापसाचे क्षेत्र प्रादूर्भावग्रस्त असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
२० हजार शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा
जिल्ह्यातील कापूस उत्पादकांपैकी २० हजार ६६६ शेतकºयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन कृषी विभागाने पिकांचा पंचनामा केला आहे. १६ डिसेंबरपर्यंत २१ हजार २९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचा पंचनामा पूर्ण झाला होता. त्यात सेलू तालुक्यातील सर्वाधिक ७ हजार ९५० हेक्टर, पूर्णा तालुक्यातील ६ हजार १९७ हेक्टर.
परभणी तालुक्यातील १ हजार ४४८ हेक्टर, जिंतूर १ हजार ४१० हेक्टर, पाथरी १ हजार १३२ हेक्टर, मानवत १ हजार ८९ हेक्टर, गंगाखेड ८३० हेक्टर, सोनपेठ ७८५ हेक्टर आणि पालम तालुक्यातील ३२९ शेतकºयांच्या १८८ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचा पंचनामा पूर्ण झाला आहे.
आणखी १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पंचनामे करण्याचे काम शिल्लक असून कृषी विभागाची यंत्रणा पंचनामे करण्याच्या कामात गुंतली आहे. येत्या आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असून शासन यावर काय निर्णय घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.