परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:28 AM2018-08-01T00:28:02+5:302018-08-01T00:29:52+5:30

जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़

Parbhani district: death of 483 children in the year | परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

Next

चंद्रमुनी बलखंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर माता, स्तनदामाता यासह बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात़ मानव विकास मिशन अंतर्गत बुडीत मजुरीसह बालकांच्या पोषणासाठीही शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जातो़ मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, मृत्यूदर पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे दिसून येत आहे़ परभणी जिल्ह्यात जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक, बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे झाली आहे़
वर्षभरात २२ हजार ५४१ बालकांचा जन्म झाला़ जन्मदराचे प्रमाण १७़९६ टक्के आहे़ असे असले तरी मृत्यूचे प्रमाणही पाहिजे त्या तुलनेत कमी होत नाही़ जिल्हाभरात १८५ उपजत बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १३, परभणी ४४, जिंतूर ३०, पालम १७, पूर्णा २१, सेलू ४० तर मानवत तालुक्यात ११ उपजत बालकांचा समावेश आहे़ उपजत मृत्यूचा दर ८़२१ आहे़ ० ते १ वर्ष वयोगटातील २३६ अर्भकांचा वर्षभरात मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १६, परभणी ६७, जिंतूर ३५, पालम २१, पूर्णा ३१, सेलू ४०, सोनपेठ ३ तर मानवत तालुक्यात १४ अर्भकांचा समावेश आहे़
अर्भक मृत्यूचा दर १०़४७ आहे़ यासोबत १ ते ५ वर्षे वयोगटातील ६२ बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये परभणी तालुक्यातील ५ बालकांचा समावेश आहे़ पाथरी तालुक्यातील ६, परभणी १०, जिंतूर १७, पालम २, पूर्णा १७ तर मानवत तालुक्यातील ५ बालमृत्यूचा समावेश आहे़ बालमृत्यूचा दर १३़२२ एवढा आहे़
२२ हजार ५४१ बालकांचा जन्म
जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत जिल्हाभरात २२ हजार ५४१ बालके जन्मली आहेत़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५९ बालके जन्मली़ पाथरी तालुक्यात १ हजार ७७०, परभणी तालुक्यात ३ हजार ९१६, जिंतूर तालुक्यात ४ हजार १७१, पालम तालुक्यात २ हजार ४३, पूर्णा तालुक्यात २ हजार ६२८, सेलू १ हजार १०२, सोनपेठ १ हजार ४३९, मानवत १ हजार ४१३ असा २२ हजार ५४१ बालकांचा वर्षभरात जन्म झाला़
एका गरोदर मातेचा समावेश
शासनाच्या वतीने गरोदर मातांसाठी बुडीत मजुरी, पंतप्रधान मातृवंदना योजना राबविण्यात येतात़ या काळामध्ये मातांना आराम मिळावा, हा उद्देश आहे़ विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी परभणी तालुक्यातील एका गरोदर मातेचाही मृत्यू झाला आहे़

Web Title: Parbhani district: death of 483 children in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.