परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय;साडेसहा कोटी खर्चूनही दुरवस्थाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:21 AM2018-12-03T00:21:45+5:302018-12-03T00:23:05+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करुन वर्षभरापूर्वी बांधलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची एका वर्षातच दुरवस्था झाली असून, नव्याचे नऊ दिवसही या इमारतीचे नाविण्य टिकले नसल्याने रुग्णांची गैरसोय मात्र कायम आहे.
मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करुन वर्षभरापूर्वी बांधलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची एका वर्षातच दुरवस्था झाली असून, नव्याचे नऊ दिवसही या इमारतीचे नाविण्य टिकले नसल्याने रुग्णांची गैरसोय मात्र कायम आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या मोठी असल्याने विविध विभागांसाठी स्वतंत्र इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मनोरुग्ण विभाग, कैदी विभाग आणि बालरुग्णांसाठी स्वतंत्र तीन मजली इमारत बांधकामास मंजुरी मिळाली. रुग्णांसाठी इमारती बरोबरच प्रशासकीय कामकाजासाठीही तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या दोन्ही इमारतींचा खर्च साधारणत: ६ कोटी ८८ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी बाल रुग्ण इमारत जिल्हा सामान्य रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी सध्या पुरुष वैद्यकीय कक्ष, बाल संगोपन कक्ष आणि बाल पोषण पुनर्वसन केंद्र चालविले जाते.
प्रवेशद्वारापासूनच या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तीन मजली इमारतीसाठी बसविलेली लिफ्ट उद्घाटनापासून आजपर्यंत सुरू नसून, केवळ लिफ्टचा सांगाडा तेवढा उभा आहे. जागोजागी फरशी उखडली असून, इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला लावलेल्या फरश्याही निखळून पडल्या आहेत. पहिल्याच मजल्याच्या खिडक्या व भिंती गुटखा, पान खाऊन थुंकल्याने घाणीने बरबटल्या असल्याचे दिसून आले. खिडक्यांची तावदानेही तुटले आहेत. एक वर्षातच या इमारतीची पार दुरवस्था झाली आहे. दुसऱ्या आणि तिसºया मजल्याची अवस्थाही अशीच वाईट आहे. एका वर्षातच या इमारतीची दुरवस्था झाल्याने रुग्णांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. नवीन इमारतींना लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर निधी मिळत नाही, अशी स्थिती असताना मंजुरी व निधी मिळाल्यानंतरही इमारत बांधकाम निकृष्ट झाल्याने त्याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
नियंत्रण नसल्याने निकृष्ट काम
४जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने बांधलेल्या दोन्ही इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एका वर्षातच या इमारतींची दुरवस्था झाल्याने कामाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे बांधकाम झाले आहे. मात्र एका वर्षातच फरश्या उखडणे, खिडक्यांच्या काचा तुटणे, स्लॅब उखडल्याने या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. किमान आरोग्याच्या संदर्भातील इमारत बांधकाम करताना दर्जा राखणे आवश्यक होते. मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.
हस्तांतरणास केला विरोध
४जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात बांधलेल्या या दोन्ही इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या इमारती ताब्यात घेण्यास विरोध केला होता. मात्र रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बाल रुग्ण विभागाची इमारत हस्तांतरित करुन घेण्यात आली. प्रशासकीय इमारत मात्र निकृष्ट कामांमुळेच अद्यापही रुग्णालय प्रशासनाने हस्तांतरित करुन घेतली नाही. या इमारतीतील कामांचा दर्जा राखावा आणि त्यानंतरच इमारत हस्तांतरित करुन घेतली जाईल, असे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला कळविले आहे. विशेष म्हणजे, सध्या या इमारतीतच सामान्य रुग्णालय प्रशासनाचे कामकाज सुरू झाले आहे.
जागोजागी कचºयाचे ढिगारे
येथील बाल रुग्ण इमारतीच्या जिन्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. इमारत परिसरात स्वच्छताही अभावानेच केली जात असल्याचे दिसून आले. इमारतीच्या प्रत्येक भिंती गुटख्याच्या पिचकाºयांनीच रंगल्या आहेत. बाल पोषण केंद्र चालविल्या जाणाºया इमारतीत एवढी अस्वच्छता असेल तर बालकांचे आरोग्य कसे सुदृढ राहील, असा प्रश्न पडतो. शुद्ध पाण्यासाठी लावलेले मशीनही बंद पडल्याचे दिसून आले.