परभणी : जिंतूर तालुक्यात ‘मुन्नाभार्इं’चा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:50 PM2018-11-24T23:50:46+5:302018-11-24T23:51:26+5:30
वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तालुक्यातील ग्रामीण भागात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांनी बिनबोभाटपणे आपला व्यवसाय थाटला असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या हितसंबंधामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.
जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा हा वैद्यकीय व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागानेही मागील वर्षी ५४ डॉक्टरांवर कार्यवाही केली होती. संबंधित डॉक्टरवर जिंतूर, बोरी व बामणी पोलीस स्थानकाला गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही महिने हे बोगस डॉक्टर एक तर भूमिगत झाले किंवा दवाखाना बंद करुन इतरत्र गेले होते; परंतु, मागील ६ महिन्यांपासून तालुक्यातील अनेक ठिकाणी हे बोगस डॉक्टर उघडपणे दवाखाने चालवित आहेत.
शहरातील नामवंत वैद्यकीय डॉक्टरांकडे काही दिवस कपाऊंडर म्हणून काम केल्यानंतर हे कपाऊंडर सहजतेने ग्रामीण भागात जावून डॉक्टर असल्याचे भासवून सलाईन, इंजेक्शन व अॅलोपॅथिक औषधी देतात. ग्रामीण भागातील अशिक्षित व गोरगरीब जनतेला फसवून हजारो रुपये उकळतात. विशेष म्हणजे, पांढऱ्या पेशा कमी होण्यापासून ते दुर्धर आजारावरही ही मंडळी सहजतेने उपचार करतात. तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या १०० पेक्षा जास्त असून आरोग्य खात्याचे दुर्लक्ष व अर्थपूर्ण संबंध हे यास कारणीभूत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाही बोगस डॉक्टरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येते. यामुळे हा व्यवसाय तालुक्यात बिनबोभाटपणे सुरु आहे.
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
४मागील वर्षी तालुक्यातील ५४ बोगस डॉक्टरांवर जिंतूर, बामणी व बोरी, चारठाणा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सोयीनुसार केला. घटनास्थळ पंचनामा, साहित्य व पुराव्याचे सखोल विश्लेषण कोर्टात दाखल करण्याऐवजी अनेक प्रकरणात पुरावे नसल्याचे कारण देऊन गुन्हा निकाली काढण्याबाबत अहवाल न्यायालयात दाखल केले. यामुळे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बोगस डॉक्टरांना आडमार्गाचा वापर
आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसल्याने आपल्यावर कार्यवाही होते, हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी आयुर्वेद, फिजिओथेरपी व इतर मार्गाचा अवलंब करुन प्रमाणपत्रे मिळविली असून, सहजपणे हा व्यवसाय करीत आहेत. मात्र रुग्णांना अॅलोपॅथीची औषधी दिली जाते. यामुळे रुग्णांच्या जिविताशी हा खेळ सुरु आहे.
आरोग्य विभागाने फिर्याद देताना व साक्षीदार देताना काळजी घेतली नाही. फिर्यादीने आरोपींना तांत्रिकदृष्ट्या गुन्हा टिकू नये, अशी फिर्याद दिल्याने व पोलीस प्रशासनाने तपासात गोलमाल पुरावे गोळा केल्यानेच न्यायालयात गुन्हे टिकले नाहीत. शिवाय आरोपींनीही फिल्डींग लावल्याने पोलिसांनी न्यायालयात ‘क’ फायनल अहवाल दिल्यानेच कारवाई पुढे चालू शकली नाही.
- मनोज सारडा, विधिज्ञ, जिंतूर
५४ बोगस डॉक्टरांवर कार्यवाही केली. मात्र पोलिसांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आपला कोणताही जबाब घेतला नाही. परिणामी अनेकांचे गुन्हे जागेवरच बंद करण्यात आले. आरोग्य खात्याने कार्यवाही केली. पण पोलिसांनी प्रकरण बंद केले.
-दिनेश बोराळकर, तालुका आरोग्य अधिकारी, जिंतूर
बोगस डॉक्टरांनी व्यवसाय करणे हे चुकीचे असून आरोग्य खात्याने यासाठी पुढाकार घ्यावा. संघटना म्हणून पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला तर कार्यवाहीबाबत आग्रह धरता येईल; परंतु, सर्वांचेच हितसंबंध असल्याने कार्यवाहीसाठी पुढाकार घेतला जात नाही.
-शिवप्रसाद सानप, डॉक्टर असो.