परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:36 PM2019-08-03T23:36:31+5:302019-08-03T23:36:42+5:30
आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.
जिल्ह्यात चार उच्चपातळी बंधारे असून या बंधाऱ्याची पूर्ण जलक्षमता ही १०१.९४ दलघमी इतकी आहे. आजघडीला या उच्च पातळी बंधाºयामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तीन लघु प्रकल्पही जिल्ह्यात असून या लघुप्रकल्पांची क्षमता ४.८४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात हे तिन्हीही लघु प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये काही अंशी पाणी शिल्लक आहे. ०.७६ दलघमी जलसाठा या बंधाºयामध्ये असून पूर्ण जलक्षमता ही २.८० इतकी आहे.
जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पांची साठवण क्षमता ही १०९.५८ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात केवळ ०.७६ दलघमी जलसाठा या प्रकल्पामध्ये उरला आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या गोदावरी, दुधना, करपरा, मासोळी, पूर्णा या प्रमुख नद्या अद्याप कोरड्याच आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर्णा नदी शनिवार पासून वाहती झाली आहे. येलदरी प्रकल्पातील जलसाठ्यातही काही अंशी पाणी वाढले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली आहे. पण त्याचवेळी जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने चिंता वाढली आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावणार आहे.