परभणी जिल्हा :एकाच जागेवर दुसऱ्यांदा वृक्षारोपण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:30 AM2018-06-18T00:30:00+5:302018-06-18T00:30:00+5:30
दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमिची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे वृक्षारोपण मोहिमेचीही अवस्था झाली आहे. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहाने झाडे लावली जातात. त्यापूर्वी जागोजागी खड्डेही केले जातात. यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. परंतु, लावलेली झाडे जगविण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाहीत. त्यामुुळे दरवर्षी केवळ वृक्षारोपण मोहिमाच राबविल्या जात आहेत. परंतु, झाडे मात्र वाढत नसल्याने जिल्ह्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. परभणी येथील गंगाखेड रोडवरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या परिसरात तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाडे लावून जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली होती. मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम घेण्यात आला. साधारणत: अर्धा एकरचा हा परिसर असून दोन वर्षापूर्वी संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक झाडाला नामफलकही लावले आहेत. परंतु, या झाडांचे संवर्धन मात्र झाले नाही. बहुतांश झाडे जळून गेली आहेत. ही परिस्थिती प्रशासनाने दाखविली नसली तरी याच परिसरात नव्याने वृक्षारोपणाची आखणी करुन बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी पुन्हा एकदा वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यासाठी ३४ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षीच्या जागेवरच नव्याने झाडे लावून उद्दिष्टपूर्ती केली जात आहे.
विभागीय कार्यालय परिसरात दोन वर्षापूर्वी आणि वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जागा शिल्लक राहायला नको होती. परंतु, जुनीच झाडे जगली नसल्याने पुन्हा एकदा वृक्षारोपणासाठी या जागेची निवड करण्यात आली आहे. त्याची तयारीही सुरु झाली आहे. विभागीय कार्यालय परिसरात जेसीबी मशीन सहाय्याने खड्डे केले जात आहेत. काही दिवसांमध्ये याच ठिकाणी पुन्हा नव्या उत्साहाने वृक्षारोपण केले जाईल. वृक्षारोपणाचे फोटो काढले जातील. परंतु, जुनी झाडे का जगली नाहीत, हा प्रश्न मात्र अनुत्तरित करणाराच आहे.
केवळ ट्रीगार्ड राहिले शिल्लक
एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात दोन वर्षापासून वृक्षारोपण केले जात आहे. २०१६ मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते त्यानंतर २०१७ मध्ये तत्कालीन विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्तेही याच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि आता पुन्हा नव्याने खड्डे खोदून वृक्षारोपण करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच जागेवर किती झाडे लावणार? असा प्रश्नही निर्माण होत आहे. झाडे लावण्याबरोबरच झाडे जगविण्याची जबाबदारी घेतली असती तर आज प्रशासनाला झाडे लावण्यासाठी जागा शोधावी लागली असती. परंतु, जुनी झाडे न जगल्याने त्याच त्या जागेवर झाडे लावून केवळ सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचे दिसत आहे.
६४ टक्के जगली झाडे
राज्य शासन दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबवून प्रत्येक जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देते. या उद्दिष्टाअंतर्गत दरवर्षी जिल्ह्यात लाखो झाडे लावली जात आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात ७ लाख २२ हजार झाडे लावली लावली होती. त्यापैकी ६४ टक्के झाडे जगल्याची माहिती वन व सामाजिक वनीकरण विभागाने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली आहे. कागदोपत्री अहवालात झाडे जगल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात मात्र शहर आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी लावलेली झाडे जगल्याचे दिसत नाही.
दोन वर्षांत ९ लाख वृक्षारोपण
२०१६ मध्ये राबविलेल्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्याला २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणावर वृक्षांची लागवड करुन उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ७ लाख ३२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. तेही जिल्ह्याने पूर्ण केले. त्यामुळे दोन वर्षात ९ लाख झाडे जिल्ह्यात लावली असून यावर्षी ३२ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.