परभणी : तीन कोटींचे अनुदान जिल्ह्याला झाले प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:53 AM2019-11-11T00:53:05+5:302019-11-11T00:53:38+5:30
संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आगामी पाच महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ राज्य शासनाने या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी २०२० पर्यंतचे २ कोटी ९३ लाख ६३ हजार १०५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आगामी पाच महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ राज्य शासनाने या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी २०२० पर्यंतचे २ कोटी ९३ लाख ६३ हजार १०५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़
राज्यातील निराधार कुटूंबियांना त्यांचे जीवन जगण्यासाठी आधार व्हावा, या उद्देशाने संजय गांधी निराधार योजना राबविली जाते़ या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रति महिना अनुदान वितरित केले जाते़ तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर केले असून, या मंजूर अर्जानुसार राज्य शासन दरवर्षी जिल्हानिहाय अनुदानाचे वितरण करते़ जिल्हा बँकेतून अथवा राष्ट्रीयकृत बँकेतून हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते़ मागील दोन वर्षांपासून शासनाच्या वतीने अनुदानाची रक्कम नियमित वितरित केली जात आहे़ त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अनुदान प्राप्त होत आहे़ यापूर्वी जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यापर्यंतचे अनुदान प्राप्त झाले होते़ आता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ७ नोव्हेंबर रोजी अध्यादेश जारी केला असून, त्यानुसार आॅक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंतचे अनुदान मंजूर केले आहे़
शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण प्रवर्गातील १५ हजार ३२३ लाभार्थी असून, या लाभार्थ्यांना प्रति महिना अनुदाना पोटी ४४ लाख ७६ हजार २६४ रुपये खर्च येतो़ शासनाने ५ महिन्यांसाठी २ कोटी २३ लाख ८१ हजार ३२० रुपये मंजूर केले आहेत़ ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय लाभार्थी संख्येनुसार तहसील कार्यालयांना रकमेचे वितरण करण्याचे आदेशात म्हटले आहे़ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पाच महिन्यांच्या वेतनासाठी निधी प्राप्त झाल्याने या लाभार्थ्यांची भविष्यातील गैरसोय दूर झाली आहे़
जिल्हाधिकाºयांनी प्राप्त झालेला निधी तालुक्याला लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार वितरित करावा, या निधीमधून झालेला खर्च संजय गांधी निराधार अनुदान योजना इतर खर्च या लेखा शिर्षाखाली खर्ची टाकावा़ वितरित केलेल्या निधीच्या तुलनेत अधिक निधी खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अव्वर सचिव अश्विनी यमगर यांनी या आदेशात दिले आहेत़
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनाही निधी
४राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ७ नोव्हेंबर रोजी आणखी एक अध्यादेश काढला असून, त्यानुसार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीही ५ महिन्यांचे अनुदान मंजूर केले आहे़ परभणी जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २ हजार ६९३ अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी आहेत़ त्यांचे वेतनही राज्य शासनामार्फत केले जाते़
४या लाभार्थ्यांना प्रतिमाह १३ लाख ९६ हजार ३५७ रुपये वेतनापोटी रक्कम लागते़ राज्य शासनाने जिल्ह्यातील या २ हजार ६९३ लाभार्थ्यांसाठी प्रतिमहिना १३ लाख ९६ हजार ३५७ रुपये या प्रमाणे ५ महिन्यांचे ६९ लाख ८१ हजार ७८५ रुपये मंजूर केले असून, हा निधी जिल्हाधिकाºयांच्या खात्यावर वर्ग केला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती लाभार्थ्यांचीही पाच महिन्यांची वेतनाची समस्या दूर झाली आहे़