अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; परभणी जिल्ह्यात गहू, ज्वारीचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:02 PM2020-04-01T19:02:45+5:302020-04-01T19:05:09+5:30
काढणीला आलेल्या ज्वारी,गहू पिकाचे नुकसान
परभणी : सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़
यंदाच्या दोन्ही हंगामात शेतक-यांना शेवटच्या टप्प्यातच निसर्गाने दगा दिला आहे़ खरीपाची सुगी निघण्याच्या तयारीत असताना अतिवृष्टी झाली़ त्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले़ त्यानंतर आता रबी हंगामातील गहू आणि ज्वारी काढणीला आली असतानाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे़ मागील आठवड्यात आणि आता परत दोन दिवसांपूर्वी या पावसाने हजेरी लावली़ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़
गहू आणि ज्वारी ही दोन्ही पिके काढणीला आली आहेत़ अनेक भागांत काढणीचे कामही सुरू आहे; परंतु, त्यातच पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे या दोन्ही पिकांचे नुकसान झाले़ परभणी तालुक्यात सिंगणापूरसह इटलापूर, बोरवंड, ब्राह्मणगाव, पोखर्णी आदी भागांत हा पाऊस झाला आहे़ रबी पिकांबरोबरच यावर्षी परिसरातील शेतक-यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे़ मात्र पावसाने भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले़ प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मगणी होत आहे़