परभणी जिल्ह्यासाठी १२५ मे.टन चनादाळ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:20 AM2018-10-22T00:20:27+5:302018-10-22T00:21:34+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात धान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात धान्य उपलब्ध करुन दिले जात आहे. गहू, साखर, तेल आदी खाद्यपदार्थांचे स्वस्तधान्य दुकानावरुन वितरण केले जाते. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला असून या काळात गोरगरीब नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन राज्य शासनाने चनादाळ आणि उडीददाळ रेशन दुकानावरुन वितरित करण्याचा निर्णय २० आॅक्टोबर रोजी घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित दराने चनादाळ व उडीददाळ वितरित केली जाणार आहे. शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी दोन्ही दाळींचे नियतन निश्चित केले आहे. या नियतनानुसार परभणी जिल्ह्याला १२५ मेट्रीक टन चनादाळ उपलब्ध होणार असून ६२ मेट्रीक टन उडीददाळ उपलब्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानावरुन या दोन्ही दाळींचे लाभार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.
वाढती महागाई आणि बाजारपेठेतील दाळींचे वाढलेले भाव लक्षात घेता सणासुदीच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दाळ उपलब्ध होत असल्याने गोरगरीब नागरिकांची आर्थिक ओढाताण थांबणार असून दिवाळीची या लाभार्थ्यांना भेट मिळणार आहे.
रेशन दुकानदारांना आवाहन
४दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. या काळात गोरगरीब लाभार्थ्यांसाठी स्वस्तधान्य दुकानांमार्फत मिळणाऱ्या दाळी उपयोगी ठरु शकतात. जिल्ह्यासाठी चनादाळ व उडीद दाळीचे नियतन मंजूर झाले असून रेशन दुकानदारांनी तत्काळ तहसील कार्यालयामध्ये चालन भरुन दाळींची उचल करावी व लाभार्थ्यांना ही दाळ वितरित करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी केले आहे.