पुरेसा चलन पुरवठा नसल्याने परभणी जिल्ह्याची आर्थिक नाडी मंदावली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:09 PM2018-04-20T18:09:47+5:302018-04-20T18:09:47+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़
परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ या बँकेला दररोज ५ कोटी रुपयांचे चलन आवश्यक असताना प्रत्यक्षात ५० लाख रुपयांचाच पुरवठा होत असल्याने आर्थिक व्यवहार करताना बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ दुसरीकडे इतर बँकांमध्येही चलन तुटवड्याची समस्या गंभीर झाली आहे़ पुरेसे चलन नसल्याने जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणून काम पाहते़ परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात बँकेच्या १६० शाखा आहेत़ या शाखांमधून शेतकरी, कष्टकऱ्यांपर्यंत निधी पुरविण्याचे महत्त्वाचे काम जिल्हा बँकेमार्फत होते़ मात्र मागील काही महिन्यांपासून या बँकेला चलन तुटवड्याच्या समस्येने ग्रासले आहे़ जिल्हा बँकेमध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी व कर्मचाऱ्यांचे खाते आहेत़ अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकेतून दिले जाते़ बँकेला दररोज ५ कोटी रुपयांची आवश्यकता असते़ मात्र परभणी जिल्ह्यातील करन्सी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियामधून पुरेसा चलन पुरवठा होत नाही़ त्यामुळे बँकेचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ जिल्हा बँकेतून अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना तसेच शासकीय सेवा सुविधा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते़ सध्या पीक विमा व निराधारांचे वेतन देण्याचे काम सुरू आहे़ परंतु, चलन तुटवडा भासत असल्याने ही कामे खोळंबली आहेत़
एटीएम बनले कॅशलेस
परभणी शहरात राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांची ५० हून अधिक एटीएम केंद्रे आहेत़ शहराच्या विविध भागांत असलेल्या या एटीएममधून ग्राहकांना रोख रक्कम हाती मिळते़ दोन दिवसांपासून या एटीएमचा व्यवहारही कोलमडला आहे़ बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याने ग्राहकांना धावपळ करावी लागत आहे़ दिवसभर उन्हामध्ये एटीएममध्ये रोकड आहे का, याचा शोध घेत ग्राहक फिरत आहेत़ त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, किमान शहरातील एटीएम केंदे्र तरी सुस्थितीत सुरू ठेवावेत़ पुरेशी रक्कम या एटीएममध्ये टाकावी, अशी मागणी होत आहे़
आॅनलाईन व्यवहाराचा ग्राहकांना फटका
एकीकडे एटीएममध्ये बँकांकडून मुबलक प्रमाणात पैसे उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांनी आॅनलाईन व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे़ परंतु, विविध बँकांकडून या आॅनलाईन व्यवहारापोटी काही रुपयांची रक्कम आकारली जात आहे़ त्यामुळे याचा ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे़ शिवाय जीएसटीच्या नावाखालीही ग्राहकांच्या खात्यामधून पैसे कपात केले जात असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ बँक स्टेटमेंट, बँकेचे दुसरे पासबुक देणे आदी कामांसाठी यापूर्वीपासून बँकांकडून शुल्क आकारले जात आहे़
निराधारांची वाढली गैरसोय
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून शासनाचे अनुदान या बँकेमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते केले जाते़ मात्र मागील काही दिवसांपासून पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने गोरगरीब लाभार्थ्यांची परवड होत आहे़ या लाभार्थ्यांना त्यांचे वेतन पुरविताना बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ बँकेच्या उपव्यवस्थापकांनी या संदर्भात पत्र काढून ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे़ करन्सी बँकेकडून मुबलक चलन पुरवठा झाल्यानंतरच व्यवहार सुरळीत होतील, असेही कळविले आहे़