परभणी : जिल्ह्याची नजर आणेवारी ५४ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:58 AM2018-10-04T00:58:53+5:302018-10-04T00:59:30+5:30
खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खरीप हंगामातील पीक उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी येत असून, महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४९ गावांचे सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्याची पैसेवारी ५४.२४ टक्के निघाल्याचा अहवाल २९ सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे नजर आणेवारीत जिल्ह्यातील उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाल्याने आता सुधारित आणि अंतिम आणेवारीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. यापूर्वी या आणेवारीवरुनच दुष्काळाचेही मूल्यमापन केले जात होते. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करुन नजर पैसेवारी जाहीर केली आहे. त्यात जिंतूर तालुक्याची सर्वात कमी ५२ पैसे आणि पाथरी तालुक्यातील ५२.८५ पैसे आणेवारी निघाली आहे. इतर तालुक्यांची नजर आणेवारीही ५२ ते ५७ पैशांच्या आसपास आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक नजर आणेवारी ५४.२४ पैसे निघाल्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या मदतीवरही पाणी फेरले गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन, कापूस, तूर, मुग ही महत्त्वाची पिके घेतली गेली. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय सोयाबिन पिकावही रोगाचा प्रादुर्भाव आहे. तब्बल दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकीकडे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निघाली आहे.
सुधारित आणि अंतिम आणेवारीत या पैसेवारी किती फरक पडतो, यावरच शासकीय मदतीचे गणित अवलंबून राहणार आहे.
सर्व गावे ५० पैश्यांपेक्षा अधिक
महसूल प्रशासनाने काढलेल्या नजर आणेवारीत एकाही गावात ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी निघालेली नाही. सर्वच्या सर्व गावांमध्ये ५० पैश्यांपेक्षा अधिक पैसेवारी निघाल्याने आता सुधारित आणेवारीत काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या गावा-गावात पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगानंतरच सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.