परभणी : दिवाळीसाठी चना डाळ, उडिद दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:16 AM2018-10-30T00:16:24+5:302018-10-30T00:16:53+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत चनाडाळ, उडिद आणि साखर जिल्ह्याला प्राप्त झाली असून, गोरगरीब लाभार्थ्याना रास्त दरात दिवाळीपूर्वी या धान्याचे वितरण केले जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत चनाडाळ, उडिद आणि साखर जिल्ह्याला प्राप्त झाली असून, गोरगरीब लाभार्थ्याना रास्त दरात दिवाळीपूर्वी या धान्याचे वितरण केले जाणार आहे़
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रेशनकार्ड धारक लाभाथ्यांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचे वितरण केले जाते़ मागील वर्षांपासून ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण होत असल्याने पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्याचा कोटा पोहचविणे प्रशासनाला सोयीचे झाले आहे़ पुढील आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये दिवाळीचा सण साजरा केला जात आहे़ खुल्या बाजारपेठेमध्ये अन्नधान्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून, वाढत्या महागाईमुळे सण साजरा करतानाही गोरगरीब लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत़ ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने साखर, चनाडाळ आणि उडीद डाळ रेशन दुकानांवरून वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे़ दिवाळी सणासाठी हे धान्य परभणी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे़ जिल्हा पुवठा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याला नोव्हेंबर महिन्यासाठी १२५ क्विंटल चनाडाळ प्राप्त झाली असून, ३० रुपये किलो या दराने या डाळीची विक्री केली जाणार आहे़ तसेच ६२ क्विंटल उडीद डाळ प्राप्त झाली असून, ४४ रुपये या दराने उडीद डाळीची विक्री होणार आहे़ दिवाळी सणासाठी गोडधोड पदार्थ करण्याची प्रथा रुढ आहे़ यासाठी लागणारी साखरही रेशन दुकानांवरून उपलब्ध करून दिली जाणार आहे़ जिल्ह्याला १९९३ क्विंल साखर प्राप्त झाली असून, २० रुपये किलो प्रमाणे साखरेची विक्री केली जाणार आहे़ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या न्यायानुसार अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे़ लाभार्थ्यांनी रेशन दुकानांवरून उपलब्ध झालेले अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे़