परभणी : चारा मिळेना; उसाच्या वाढ्यांना आला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:25 AM2019-02-27T00:25:43+5:302019-02-27T00:25:59+5:30
तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.
अतूल शहाणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुर्णा (परभणी) : तीन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून तालुक्यातील ८८ हजार २९१ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून वापरत आहेत.
पूर्णा तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी रबी पेरणी झाली नाही. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सुटल्याने अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक नाही. परिणामी रबी हंगामातील गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके हातची गेली आहेत. उन्हाळा सुरू होत असताना शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.
पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ९५ गावांत ४५ हजार ४०० गाय वर्ग, १५ हजार ९६१ म्हैसवर्ग, २२ हजार ३४७ शेळ्या, ४ हजार ५०८ मेंढ्या तर ४१ घोडे अशी जनावरांची संख्या आहे. पाऊस थांबल्यापासून शेतात असलेल्या हिरव्या चाऱ्यानंतर सोयाबीनच्या गोळीचा वापर चारा म्हणून सुरू झाला. त्यानंतर आता उसाचे वाढे चाºयासाठी पर्याय ठरत आहेत. सद्य स्थितीत ऊस साखर कारखान्यावर पाठविला जात आहे. त्यामुळे वाढे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पावसाळी हायब्रीड ज्वारी व हिवाळी टाळकी ज्वारीचे पीक उपलब्ध नसल्याने उसाच्या वाढ्याला भाव आला आहे. तालुक्यात चारा टंचाई गंभीर होत असून पशूपालकांना चाºयाची चिंता लागली आहे.
चाºयासाठी बियाणे वाटप
४पंचायत समितींतर्गत येणाºया सात पशुवैद्यकीय केंद्रात मागील पंधरवड्यात चारा उपयोगी बियाणे वाटप करण्यात आले. विविध योजनेंतर्गत मका व संकरित ज्वारीचे ११९० कि.ग्रॅम बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे, असे असले तरी पाणी उपलब्ध नसल्याने हे बियाणे उगवतील की, नाही, या विषयी शंका निर्माण होत आहे.
पशुधनाची बाजारात विक्री
४चाºयाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बहुतांश शेतकºयांनी आपले पशुधन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे जनावरे कशी जोपासावीत, असा भावनिक सवाल शेतकरी करीत आहेत.परिणामी जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी येत आहेत.
‘चारा छावण्या सुरू करा’
तालुक्यात चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने या संदर्भात प्राधान्याने विचार करून आगामी काही दिवसात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केली आहे.