परभणी : वाळू उपसा करणारी गाढवं पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:43 PM2019-01-15T23:43:35+5:302019-01-15T23:43:50+5:30
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
गेल्या महिन्यात १० डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करणारी २६ गाढवं पकडून त्यांचा लिलाव केला होता. यातून गाढवांच्या माध्यमातून होणारी वाळूचोरी काही प्रमाणात थांबली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, शिवाजी मुरकुटे, गजानन शिंदे यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करणारी ७ गाढवं ताब्यात घेतली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. वाळू उपसा करताना पकडलेल्या सात गाढवांना धारखेड ग्रामपंचायत कार्यालयाचे सेवक मुंजाजी चोरघडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीप्रमाणेच गाढव मालक समोर आले नाहीत. त्यामुळे या गाढवांचाही लिलाव करण्याची वेळ महसूल प्रशासनावर येणार असल्याची चर्चा आहे.