परभणी : रेल्वे मार्गावर ४० कि.मी.चे दुहेरीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:48 AM2018-12-26T00:48:52+5:302018-12-26T00:48:55+5:30
परभणी ते मुदखेड या ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४० कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : परभणी ते मुदखेड या ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४० कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.
मुदखेड ते मनमाड या मार्गावरील परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून हे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे. परभणी ते मुदखेड हा ८१.४० कि.मी. अंतराचा मार्ग असून २०१२-१३ मध्ये या मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली. ३९०.६० कोटी रुपये खर्चापैकी ३ वर्षामध्ये २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून त्यात यावर्षी ५५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी ते मुदखेड या मार्गापैकी परभणी ते मिरखेल हा १७ कि.मी.चा मार्ग जून २०१७ मध्ये पूर्ण होऊन सध्या वापरात येत आहे. तसेच मुगट ते मुदखेड हा ९.३ कि.मी. चा मार्गही दुहेरीकरण झाला असून १० आॅक्टोबरपासून या मार्गावरुनही वाहतूक सुरु झाली आहे. लिंबगाव- नांदेड- मालटेकडी या १४.१० कि.मी. अंतराच्या दुहेरीकरण मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. १७ आॅक्टोबरपासून हा मार्गही सुरु करण्यात आला आहे. एकूण ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४०.४ कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला मिरखेल ते लिंबगाव (३०.९० कि.मी.) आणि मालटेकडी ते मुगट (१० कि.मी.) या उर्वरित ४१ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड या मार्गाचे पूर्णत: दुहेरीकरण झाल्यानंतर मराठवाड्यातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. सद्यस्थितीला ३५ ते ४० गाड्या एकल मार्गावरुन धावतात. दुहेरीकरणानंतर या गाड्यांची गती वाढणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
विद्युतीकरणाचेही लवकरच काम
४परभणी ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासोबतच विद्युतीकरणाचे कामही नांदेड विभागाच्या वतीने घेतले जाणार आहे. हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत जमीन संपादन, केबल कार्य, मोठे आणि छोट्या पुलांचे बांधकाम, रिले रुम्स्, केबीन आदी कामे पूर्ण करण्यात आली असून प्रवाशांसाठी उंच प्लॅटफॉर्म, बँचेस, पाण्याची सुविधा ही कामेही रेल्वेस्थानकावर पूर्ण झाली आहेत. रेल्वे मार्गाशी संबंधित ग्लू जॉर्इंटस्, ट्रेकलाईनिंग आदी कामे बाकी असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.