परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:12 AM2019-10-27T00:12:37+5:302019-10-27T00:12:57+5:30
जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला असून खरीप हंगामातील पिकांचे अक्षरश: नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात येणारी पिके शेतातच सडू लागली आहेत. ज्या पिकांच्या भरवशावर दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. तीच पिके निसर्गाने हिरावून घेतली आहेत.
सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना नगदी पीक म्हणून पाहिले जाते. खरीप हंगामातील ही पिके दिवाळीपूर्वी बाजारपेठेत येतात आणि या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळतो. यावर्षी पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणीही एक महिना उशिराने झाली आहे. हे सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसाने पिकांची नासाडी केली आहे.
आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. शुक्रवारी दिवसभर आणि रात्री जिल्हाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात पालम तालुक्यात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ३६.७६, पूर्णा ६३.६०, गंगाखेड ४४.२५, सोनपेठ ३१, सेलू ४७.६०, पाथरी २७, जिंतूर १८.१७, मानवत २८.६७ असा जिल्हाभरात सरासरी ४०.४५ मि.मी. पाऊस झाला आहे.
शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्याने वार्षिक सरासरीही ओलांडलीही आहे. जिल्ह्यात आतापर्यत ७७७ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. एवढी आहे. परभणी तालुक्यात ६१६, पालम ८७३, पूर्णा ८९६, गंगाखेड ७४७, सोनपेठ ६९६, सेलू ८०५, पाथरी ९१८, जिंतूर ६१४ आणि मानवत तालुक्यात ८२५ मि.मी. पाऊस झाला.
शनिवारीही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रीच्या सुमारास आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली असून शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीसह छोट्या नद्यांना पूर आला आहे. पूर्णा- ताडकळस मार्गावरील पिंगळगड या छोट्या नदीला पूर आल्याने शनिवारी दुपारी ३ वाजेपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पालम तालुक्यात १२५ टक्के पाऊस
वार्षिक सरासरीच्या तुलनेत पालम तालुक्यामध्ये १२५ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात १११ टक्के, गंगाखेड १०७ टक्के आणि पाथरी तालुक्यामध्ये ११९ टक्के व मानवत तालुक्यात १०१ टक्के पाऊस झाला. तर परभणी ७१ टक्के, सोनपेठ ९९ टक्के, सेलू ९८ टक्के आणि जिंतूर तालुक्यामध्ये केवळ ७५ टक्के पाऊस झाला आहे.
७ मंडळांमध्ये अतिवृष्टी
शुक्रवारी रात्री ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सेलू तालुक्यातील सेलू मंडळात ९८ मि.मी., पालम तालुक्यातील चाटोरी मंडळात ८९ मि.मी., पालम मंडळात ७२ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ६५, चुडावा मंडळात ७२, लिमला मंडळात ६९ आणि ताडकळस मंडळात ६९ मि.मी. पाऊस झाला आहे.