परभणी : कोरड्या पाणवठ्यांनी वन्य प्राणी सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:38 AM2019-05-16T00:38:33+5:302019-05-16T00:39:00+5:30
जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात वन विभागाने उभारलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याची बाब बुधवारी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली़ त्यामुळे वन विभागाचे नियोजन केवळ कागदोपत्रीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे़ त्याहीपेक्षा पाणी नसल्याने वन्य प्राण्यांची होत असलेली भटकंती दुष्काळाचे चित्र अधिक दाहक करीत आहे़
प्रशांत मुळी।
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी : जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात वन विभागाने उभारलेल्या सहा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याची बाब बुधवारी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली़ त्यामुळे वन विभागाचे नियोजन केवळ कागदोपत्रीच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे़ त्याहीपेक्षा पाणी नसल्याने वन्य प्राण्यांची होत असलेली भटकंती दुष्काळाचे चित्र अधिक दाहक करीत आहे़
परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातच वनक्षेत्र आहे़ येलदरी ते सिद्धेश्वर धरण या दरम्यान जंगल परिसर असून, हा भाग इटोलीच्या शिवारात येतो़ साधारणत: ६५ किमी अंतराचे हे जंगल आहे़ या जंगलात विविध वन्य पशू आहेत़ या पशूंसाठी अन्न, पाण्याची सुविधा करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे़ जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेना झाले आहे़ अशा परिस्थितीत जनावरांची काय अवस्था असेल, याचा शोध घेण्यासाठी इटोली जंगल गाठले तेव्हा जंगल परिसरात एकाही ठिकाणी पाण्याचा थेंबही आढळला नाही़ त्यामुळे या जंगलातील प्राणी पिण्यासाठी पाणी कसे मिळवित असतील? हिरवी झाडे वाळल्याने चाऱ्याची काय अवस्था असेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
१५ मे रोजी सकाळी हा जंगल परिसर फिरण्यास सदरील प्रतिनिधीने सुरुवात केली़ एकेकाळी हिरवीगर्द दाट असलेली झाडी दिसली नाही़ त्याऐवजी पानगळ झाल्याने ओबडधोबड अस्तित्व टिकवून असलेली झाडे, झाडांच्या बुडांशी वाळलेला पाला, डोक्यावर तीव्र उन्हाच्या झळा अशी परिस्थिती पहावयास मिळाली़ इटोली भागातील जंगलात पाणवठ्यांचा शोध घेतला असता सहा पाणवठे आढळले; परंतु, त्यापैकी एकातही पाणी नव्हते़ दोन-चार दिवसांपूर्वी पाणवठ्यातील पाणी संपले असेल तर किमान ओलावा दिसला असता; परंतु, तोही दिसून आला नाही़ त्यामुळे वन विभागाचे पाणवठ्याचे नियोजन कागदावरच असल्याचे पहावयास मिळाले़ जंगलात कुठेच पाणी उपलब्ध नसेल तर हे वन्य पशू पाण्याच्या शोधात परिसरातील गाव शिवारात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे़ वन विभागाने दोन वर्षापूर्वी या भागात सहा पाणवठे उभारले़ या पाणवठ्यांत १५ दिवसांतून एकदा टँकरने पाणी टाकले जाते़ त्यावर १२०० रुपये खर्च येतो़ मात्र टंचाई परिस्थितीमुळे पाणी लवकर संपते, असे सांगितले जाते. ही बाब वन विभागाकडून गांभिर्याने घेतली जात नसल्याने प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ द
३५० हून अधिकपशू-पक्षी
४जिंतूर तालुक्यातील जंगल परिसरात सुमारे ३७६ पशूंची गणना वन विभागाने मागील वर्षी केली आहे़ त्यामध्ये या जंगलात हरीण, काळवीट, मोर, लांडोर, तरस, नीलगाय, उदमांजर, रानडुक्कर, वानर इ. पशू आढळतात़ पशूंची ही संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांसाठी नियोजन करण्याची गरज आहे़
४जंगल परिसरातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने अनेक पशु-पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे़ या भागातील पाणवठ्यांवर परदेशी पक्षीही काही दिवसांपूर्वी येत होते; परंतु, पाणी शिल्लक नसल्याने हे पक्षीही आता या भागात दिसत नाहीत़
४हिरव्यागार वनराईमध्ये वावरणाºया विविध पक्ष्यांची जंगलात रेलचेल राहत होती़ बुधवारी केलेल्या पाहणीत पक्ष्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले़ हिरवी झाडे अभावानेच असल्याने चिमणी, कावळे, सुतारपक्षी यासारखे पक्षी पहावयास मिळाले नाहीत़ त्यामुळे दुष्काळाचा परिणाम पक्ष्यांवरही झाल्याचे दिसत आहे़
आठवड्याला एका टँकर पाणीपुरवठा
४इटोली परिसरात असलेल्या पानवठ्यांमध्ये एक आठवड्यातून एक टँकर पाणी टाकले जाते़ हे वनक्षेत्र एवढे मोठे आहे की, सहा पानवठे अपुरे पडतात़ पानवठ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे़ उपलब्ध पानवठ्यात पाणी टाकल्यानंतर हे एक ते दोन दिवस पुरते़ त्यानंतर पाणी टाकण्याची शाश्वती नसते़ त्यामुळे प्राण्यांची पाण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे़ ीचे पात्र कोरडेठाक
४या जंगल परिसरातून पूर्णा नदी वाहते़ मात्र नदीचे पात्र सद्यस्थितीला कोरडेठाक पडले आहे़ नदीकाठावर किंवा पात्रात कुठेही पाण्याचे डबकेही पहायला मिळाले नाही़ त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़
४कृत्रिम पानवठे आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला पुरेसा निधी मिळत नाही़ परिणामी वन्य प्राण्यासाठी पाणी आणि चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जंगलातील प्राणी इतरत्र स्थलांतरित होण्याची भीती निर्माण झाली आहे़
वन विभागाचा दावा ठरला फोल
४वन विभागाच्या वतीने जंगालात पाण्यासह २० पानवठे वन्य प्राण्यांसाठी उभारल्याचे सांगण्यात आले होते़ प्रत्यक्षात केलेल्या पाहणीत सहा ठिकाणचे कोरडे पानवठे आढळले़ त्यामुळे या विभागाचा दावा फोल ठरला आहे़
जंगलाच्या प्रक्षेत्रात पाण्याबरोबरच चाºयाचाही निर्माण झाला प्रश्न
इटोली पसिरात पाण्याबरोबरच चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे़ या भागात वावरणाºया वन्य प्राण्यांपैकी अनेक प्राणी, पक्षी शाकाहारी आहेत़ त्यामध्ये माकड, ससे, निलगाय या प्राण्यांबरोबरच विविध जातींचे पशू-पक्ष्यांना झाडांचा पाला, फळे अन्न म्हणून लागते़ दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बहुतांश झाडे वाळली आहेत़
त्यामुळे ओला चारा या भागात शिल्लक नाही़ परिणामी पशू-पक्ष्यांची चाºयासाठी देखील भटकंती होत आहे़ जंगलात निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन अनेक पशू-पक्षी या भागातून स्थलांतरित होण्याची शक्यता आहे़ तेव्हा वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
इटोलीच्या जंगलात मोठी वन्यसंपदा
४सुमारे ६५ किमी अंतरावर पसरलेल्या या जंगलामध्ये नदी, नाले, ओढे आणि विविध जातींची झाडे अशी वन्य संपदा मोठ्या प्रमाणात आहे़ त्याच प्रमाणे विविध प्राणीही या जंगलात आढळतात़ सद्यस्थितीला हे जंगल ओसाड पडल्यासारखे झाले आहे़
४नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या घनदाट जंगलात १५ वर्षाखाली दाट झाडी होती़ त्यात सागवान, लिंब, खैर, बाभूळ, आंबा ही झाडे मोठ्या प्रमाणात होती़ मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वृक्ष संपदा नामशेष झाली आहे़ जंगलातील झाडांची संख्याही कमी झाली असून, त्याचा परिणाम वन्य जीवांवर होत आहे़
४इटोली भागातील जंगल प्रक्षेत्रात होणारी वृक्षतोड थांबविणे, येथील प्राण्यांना संरक्षण देणे यासाठी वन विभागाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ परंतु, या कामांकडे फारसे लक्ष दिले जात नाही़ परिणामी जंगलामध्ये काही भागात वृक्षतोड होत आहे़
४मागील एक वर्षापासून टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊसमान कमी झाल्याने या जंगलाचा मोठा ºहास झाला आहे़ संपूर्ण जंगल भागात पाणी उपलब्ध नसल्याने वन्यप्राण्यांची परवड होत आहे़
जंगलात कशाला जाता? आॅफीसलाच या, माहिती देतो...
इटोली येथील जंगलाची पाहणी करण्याच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सदरील प्रतिनिधीने जिंतूर येथील वन विभागातील इटोली बीटचे गार्ड आमेर शेख यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व जंगलातील माहिती विचारली असता, त्यांनी जंगलात कशाला जाता? जिंतूरच्या आॅफीसमध्ये या़़़ सर्व माहिती देतो, असे सांगितले़ त्यांना प्रत्यक्ष जंगलाची पाहणी करायची आहे, असे सांगितल्यानंतरही त्यांनी कार्यालयातच येऊन माहिती घेण्याचा सल्ला दिला़
इटोलीच्या जंगालातील परिस्थितीची पाहणी करण्याच्या अनुषंगाने माहिती घेतली असता वन विभागाच्या वतीने या जंगलातील पाणवठ्यामध्ये पाणी टाकण्यासाठी इटोली येथील आडे नावाच्या कंत्राटी कर्मचाºयाची नियुक्ती केल्याचे समजले़ त्यानुसार मंगळवारी सायंकाळी आडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व त्यांना इटोलीच्या जंगलात सोबत येण्याची विनंती केली असता, त्यांनी होकार दिला़ अधिक माहितीसाठी त्यांनी जिंतूरच्या अधिकाºयांचा फोन नंबर देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले़
जिंतूरच्या अधिकाºयांनी जंगलात न जाता कार्यालयातच येण्याचा सल्ला दिला होता़ त्याकडे दुर्लक्ष करून बुधवारी सकाळी कंत्राटी कर्मचारी आडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व त्यांना जंगलात येण्याची विनंती केली असता, त्यांनी आज मला भरपूर काम आहे़ त्यामुळे येऊ शकत नाही, असे सांगितले़ त्यामुळे आडे यांच्याविना जंगलातील सफर सदरील प्रतिनिधीने सुरू केली़
चार किमी केली पायपीट
जंगलातील पाणवठे शोधण्यासाठी सदरील प्रतिनिधीने इटोली जंगलातील चार किमीचा परिसर धुडाळला़ यावेळी जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचेही दिसून आले़ उन्हाळ्यामध्ये झाडे वाळलेली आहेत़ त्याचाही गैरफायदा वृक्षतोड माफियांनी घेतल्याचे दिसून आले़ या प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून जिल्ह्याचा वन विभाग किती दक्ष आहे, हेही याद्वारे दिसून आले़