परभणी : चुडावा गावच्या विहिरी कोरड्याठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:26 AM2019-08-10T00:26:43+5:302019-08-10T00:27:12+5:30
राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही कोरड्याठाक असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही कोरड्याठाक असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी तालुक्यातील अनेक भागात अजूनही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. चुडावा मंडळात ३ आॅगस्ट रोजी १२ तासात ७१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद तालुका प्रशासनाकडे आहे. या नोंदीमुळे हा भाग अतिवृष्टीमध्ये नोंदविण्यात आला. मात्र या भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. अगोदरच या भागात पाऊस नसल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. त्याच बरोबर अनेकांच्या पेरण्याही झाल्या नाहीत.
अधूनमधून रिमझीम पडणाऱ्या पावसाच्या भरोशावर पेरणी केलेली पिके आजही तग धरून असली तरी पुढील काळात पुरेसा पाऊस न झाल्यास ही पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीची नोंद झालेल्या चुडावा परिसरात पाण्याअभावी विहिरी कोरड्याठाक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, भर पावसाळ्यात विहिरीचे खोदकाम करण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. चुडावा येथील शेतकरी कैलास देसाई, गजानन देसाई, दिनकर देसाई, रमेश देसाई यांच्या सामायिक विहिरीचे खोदकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून तालुक्यात विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. कदाचित त्या निकषाचा पाऊस झाला असला तरी या भागातील स्थिती गंभीर आहे. अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागात कायम आहे. तर जलस्त्रोतांना अजूनही पाणी आलेले नाही. भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी या भागात मोठ्या पावसाची गरज आहे.
-किशोर देसाई,
शेतकरी, चुडावा