परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:39 AM2019-03-05T00:39:04+5:302019-03-05T00:39:45+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़

Parbhani: Due to delayed work order | परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

परभणी: कार्यारंभ आदेशाअभावी रखडली कामे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड  (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असून कामाच्या शोधार्थ अन्य मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़
गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़
यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़
यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़
रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़
तालुक्यातील अपूर्ण कामे संथ गतीने
गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकूल योजनेतील अपूर्ण असलेल्या २७८ घरकुलांच्या कामांपैकी २१५ कामेच सुरू करण्यात आली आहेत़ या घरकुलांच्या कामांवर ८६० मजूर कार्यरत आहेत़ तसेच गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या ५५३ सिंचन विहिरींपैकी १८ विहिरींच्या कामांवर २४८ मजूर तर शोष खड्ड्यांच्या २८ कामांवर ३२० मजूर असे एकूण १४२८ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड, रोपवाटीका या कामांवर ७२ मजूर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा रेशीम उद्योग विभागाच्या तुती लागवड व किटक संगोपनाच्या १२ कामांवर ८५ मजूर कार्यरत असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले़ मात्र ही सर्व कामे कागदोपत्री असल्याचाच आरोप जॉबकार्डधारक व ग्रामस्थांमधून केला जात आहे़
मजुरांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊ
तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील मजुरांनी कामांची मागणी केल्यास मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून दिली जातील, त्याचबरोबर मजुरांनी इतरत्र स्थलांतर न करता कामाच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावेत़ गावातील पाणी गावातच मुरून पाणीटंचाईवर करण्यासाठी तसेच डास निर्मूलनासाठी शोष खड्ड्यांचे प्रस्तावही दाखल करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांनी केले आहे.

Web Title: Parbhani: Due to delayed work order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी