परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:19 AM2019-03-04T00:19:07+5:302019-03-04T00:19:35+5:30
कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर १ ते २ क्विंटलवरच समाधान मानावे लागले. पाण्याची सुविधा असणाºया शेतकऱ्यांनाही अपेक्षेप्रमाणे कापसाचे उत्पादन मिळाले नाही.
यावर्षी कमी उत्पादन असल्याने कापसाचे भाव तेजीत राहातील, अशी आशा शेतकºयांना लागली होती. मात्र मागील आठवडाभरापासून कापसाचे भाव कमी होत असल्याने शेतकºयांना चिंता लागली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टरवर जास्त कापसाची लागवड झाली होती. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल असे वाटत असतानाच पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.
कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमतीमुळे तसेच कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत उत्पादक नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली आहे. सुरुवातील ६ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र त्यानंतरच्या काळात ५७०० ते ५८०० या दरावर भाव स्थिरावले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव वाढतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम होते. ज्या शेतकºयांना ४ ते ५ क्विंटल कापूस झाला आहे. असेच शेतकरी पैशांच्या चणचणीमुळे भाववाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करुन मोकळे झाले आहेत. मात्र ज्या शेतकºयांना जास्तीचे उत्पादन झाले, अशा शेतकºयांनी दरवाढ होईल, या आशेने कापूस घरात ठेवला होता. या शेतकºयांची अशा फोल ठरली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या लिलावात कापसाला वरचा दर ५४९० रुपये मिळाला.
मागील आठवडाभरात कापासाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शासकीय सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी बाजार समितीचे सर्व कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य बाजार समिती संघाने आपले आंदोलन मागे घेतल्याने ५ मार्चपासून बाजार समितीत कापासाचा लिलाव सुरु होत असल्याची माहिती बाजार समितीने काढलेल्या परिपत्रकात दिली आहे. शेतकºयांनी आपला कापूस परस्पर न विक्री करता लिलावात विक्री करावा, असे अवाहन सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, प्रभारी सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे.
खाजगी व्यापाºयांना प्राधान्य
कापूस लिलावात सीसीआयकडून खरेदी करण्यात येत आहे. १५ हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी केला आहे. शासकीय हमीभाव ५४५० प्रती क्विंटल आहे. सीसीआयकडून मिळणाºया हमीभावापेक्षा खाजगी व्यापाºयांकडून मिळणारा भाव जास्त असल्याने व रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत.