परभणी : सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या यातनांत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:46 AM2019-05-13T00:46:31+5:302019-05-13T00:46:55+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. विविध तपासण्या करण्यासाठी असलेल्या मशिनरी जुन्या झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. विविध तपासण्या करण्यासाठी असलेल्या मशिनरी जुन्या झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचाराचा आधार मिळू शकतो. मात्र येथील जिल्हा रुग्णालय अनेक असुविधांनी ग्रासले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील एक्स-रे मशीन जुनी झाली असून या मशीनचा सध्या वापर होत नाही. त्यामुळे एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. सोनोग्राफी करण्यासाठी मशीन उपलब्ध आहे. कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यामार्फत तपासण्या केल्या जातात. प्रसुती काळातील महिला रुग्ण तसेच इतर रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची नियमित सोनोग्राफी होत असली तरी बाहेरहून आलेल्या रुग्णांसाठी मात्र सोनोग्राफीची तपासणी करुन दिली जात नाही, अशी रुग्णांची ओरड आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील या समस्यांबरोबरच स्वच्छता, इमारतींची दुरवस्था हे प्रश्नही रुग्णांना सतावत आहेत. जिल्हा रुग्णालयात नव्यानेच बालरुग्ण विभागांसाठी टोलेजंग इमारत बांधकाम करण्यात आले आहे; परंतु, या इमारतीच्या खिडक्या तुटल्या आहेत. फरशी अनेक ठिकाणी उखलडी आहे. त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असताना त्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
परभणी जिल्हा रुग्णालयातून रुग्ण रेफर करण्याचे वाढले प्रमाण
४येथील जिल्हा रुग्णालयात केवळ किरकोळ आजारांवरच उपचार केले जात आहेत. एखाद्या गंभीर आजाराचा रुग्ण दाखल झाल्यास त्याला सरळ नांदेड येथे हलविले जाते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होत नाहीत.
४विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाºया सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचीही नेमणूक झाली आहे. असे असताना केवळ धोका का पत्करायचा या भूमिकेतून रुग्णांना नांदेड, औरंगाबाद या सारख्या शहरातील रुग्णांलयामध्ये रेफर केले जात आहे.
४मागील वर्षभरापासून रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णांच्या नातेवाईकांनी या विषयी अनेक वेळा तक्रारी करुनही रेफर करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. इतर रुग्णालयात रेफर केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा पैसा व वेळ जात आहे.
रुग्णांसाठी विकतचे पाणी
४जिल्हा रुग्णालय परिसरात रुग्णांसाठी पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही. याच भागात बुलढाणा अर्बन बँकेने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला असून तेथून पाणी विकत घ्यावे लागते.
४ सध्या उन्हाळ्याचे दिवस असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिवसभरासाठी लागणारे पाणी चक्क विकत घ्यावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.
या समस्याही भेडसावतात
४जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासते. मात्र रक्तपेढीत रक्तसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते.
४रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास नातेवाईकांपैकी कोणीतरी रक्तदान केल्यानंतरच त्यास रक्त उपलब्ध होत आहे. रक्ताच्या समस्येबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची कमतरता भासत असून एका बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सर्व समस्यांना निपटारा करावा, अशी मागणी आहे.
४जिल्हा रुग्णालयातील किमान आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.
डॉक्टरांची खाजगी सेवा
४जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांपैकी बहुतांश डॉक्टर खाजगी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम होत आहे.
४ अनेक वेळा डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांनी रोषही व्यक्त केला आहे. शासकीय डॉक्टरांच्या खाजगी सेवा बंद कराव्यात, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे; परंतु, त्यावर अजूनही ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय सुरुच आहे.