परभणी : पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांना पूर; अनेक मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:58 PM2019-10-25T23:58:00+5:302019-10-25T23:59:58+5:30
पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हावासियांना मान्सूनच्या पावसाने ताण दिला असला तरी परतीच्या पावसाने मात्र दिलासा देण्याबरोबरच नुकसानीलाही सामोरे जाण्याची वेळ आणली आहे. जिल्ह्यात सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. पावसाळा संपण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यत जिल्ह्यामध्ये २०० मि.मी. पावसाची तूट होती. ही तूट ८ दिवसातच परतीच्या पावसाने भरुन काढली आहे. जिल्ह्यात आता ७३६ मि.मी.पाऊस झाला आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. संततधार आणि मध्यम स्वरुपाचा हा पाऊस सलग ३ ते ४ तास बरसला. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. २४ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार परभणी तालुक्यात २९.२३ मि.मी., पालम ५४, पूर्णा ३.६०. गंगाखेड २३.२५, सोनपेठ ४२, सेलू ७२.४०, पाथरी ८३.३३, जिंतूर ४०.८३ आणि मानवत तालुक्यात ७७.६७ असा जिल्हात सरासरी ५०.३७ मि.मी. पाऊस झाला.
सुनेगाव- सायाळा पुलावर पाणी
४गंगाखेड- जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून तालुक्यातील सुनेगाव-सायाळा येथील पुलावर पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. वाहणाºया इंद्रायणी नदीला पूर आल्याने सुनेगाव, व सायाळा गावाजवळील पुलावर पाणी साचल्याने सायाळा, सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांची वाहतूक बंद झाली. सायाळा येथून गंगाखेडकडे येण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला.
देऊळगाव : १९१ मि.मी. पाऊस
सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात तब्बल १९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पालम तालुक्यातील बनवस मंडळात ६५ मि.मी., सोनपेठ ६८ मि.मी., चिकलठाणा ७३ मि.मी., पाथरी ८१, बाभळगाव ८०, हादगाव ८९, मानवत ९०, केकरजवळा ७८ आणि कोल्हा मंडळामध्ये ६५ मि.मी. पाऊस झाला आहे.