परभणी : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात तुटणार संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:29 PM2019-06-05T23:29:36+5:302019-06-05T23:31:08+5:30
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती़ त्यामुळे या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत शासनाकडून कामे मंजूर करून घेतली़ जवळपास एक वर्षापासून या रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले; परंतु, परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर, आर्वी फाटा ते गोविंदपूर वाडी, कुंभारी बाजार ते कारला आदी गावांतील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे़ मंगळवार, बुधवारी पावसाच्या सरी कोसळल्या़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़ येत्या महिनाभरात या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर या मार्गावरील गावांचा संपर्क तुटणार आहे़ त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच वाहनधारकांचीही मोठी गैरसोय होणार आहे़ गेल्या सात-आठ महिन्यांपासून या रस्त्यांची कामे सुरू असताना अद्यापही संबंधित गुत्तेदारांकडून ही कामे पूर्ण करण्यात आली नाहीत़ ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागाकडे रस्त्यांची कामे जलदगतीने करावेत, यासाठी तक्रारी केल्या; परंतु, याचे कोणतेही सोयरसूतक बांधकाम विभागाला नसल्यामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होणार आहे़ त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली व अर्धवट असलेली कामे तत्काळ पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे; परंतु, आतापर्यंतचा बांधकाम विभागाची कार्यपद्धती पाहता ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
महामार्गाचीही कामेही मंदगतीनेच
४जिल्ह्यातील परभणी-गंगाखेड, परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी- वसमत या चारही महामार्गाची कामे सद्यस्थितीत अर्धवट अवस्थेत आहेत़
४पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत़
४त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूकही पूर्णत: कोलमडणार आहे़ परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत पाहत आहे़
४त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्याला जोडणाºया महामार्गांचीच कामे अपूर्ण असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत न बोललेच बरे़
४विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़