परभणी : पाणी पुरवठ्यात विजेचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:05 AM2019-04-29T00:05:29+5:302019-04-29T00:05:59+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
शहरात महापालिकेच्या नळ योजनेद्वारे सद्यस्थितीत १६ ते १७ दिवसांना एकवेळा पाणीपुरवठा केला जात आहे़ हा पाणीपुरवठा करताना वीज पुरवठ्याचा अडथळा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे मनपाचे म्हणणे आहे़ राहटी येथील विद्युत पंपाच्या सहाय्याने बंधाºयातील पाण्याचा उपसा केला जातो़ २४ तास हे पंप सुरू असतात़ एका तासाला ९ लाख लिटर पाण्याचा उपसा पंपाच्या सहाय्याने होतो़ तीन तासांमध्ये सुमारे २२ लाख ५० हजार लिटर पाणी उपसा होतो़; परंतु, या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी उपसा करताना अडचणी निर्माण होत आहेत़
तीन ते चार तास वीजपुरवठा बंद राहिला तर शहरातील जलकुंभात पाणीसाठा जमा होत नाही़ परिणामी, शहरवासियांचा पाणीसाठा एक दिवस पुढे ढकलला जातो़ त्यामुळे महापालिकेला पाण्याचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शहरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता महावितरण कंपनीने टंचाईचे गांभिर्य लक्षात घेऊन राहटी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे़