परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:49 AM2019-02-02T00:49:57+5:302019-02-02T00:50:38+5:30
प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे.
‘सरकारी काम महिनाभर थांब’, अशी प्रशासकीय कामकाजाची नकारात्मक प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये आतापर्यंत निर्माण झाली आहे. कोणतेही काम वेळेवर होत नाही. शिवाय पारदर्शकतेलाही वाव नसतो. परिणामी शासकीय कामासाठी अडवणूक होते. एकाच जागेवर दोन ते तीन महिने फाईली पडून राहतात, अशी अनेकांची तक्रार असते.
या तक्रारीवर मात करण्यासाठी व प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्याकरीता जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हा कचेरीत ई- आॅफीस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरीता जवळपास ५६ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला. त्यानंतर १५ हायस्पीड स्कॅनर आणि ३० संगणकांची खरेदी करण्यात आली. जिल्हा कचेरीत यापूर्वीचे ११३ संगणक उपलब्ध आहेत. येथील कर्मचाऱ्यांना ई- आॅफीस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक कर्मचाºयांना त्यांचा युजर आयडी, पासवर्ड देण्यात आला. डिजीटल सिग्नीचरही उपलब्ध करुन देण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ फेब्रुवारीपासून ई-आॅफीस प्रणालीअंतर्गत कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. आलेल्या प्रत्येक तक्रार अर्जाचे, कामासंदर्भातील आदेश प्रतिचे स्कॅनिंग करुन ते संबंधित लिपिकाकडून वरिष्ठांकडे पाठविले जाते. वरिष्ठ त्याची तपासणी करुन त्यावर त्यांचा अभिप्राय नोंदवितात. त्यानंतर सदरील फाईल विभाग प्रमुखांकडे जाते. विभागप्रमुखच याबाबत अंतिम निर्णय घेतात. गरज पडल्यास सदरील फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाते. प्रत्येक फाईलीवरील कामकाजासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाºयाकडे अधिक फाईली पेडींग राहिल्यास विभागप्रमुख व जिल्हाधिकाºयांना त्या आॅनलाईन दिसतात.
परिणामी संबंधित कर्मचाºयाची खरडपट्टी काढून त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली जावू शकते. शिवाय एखाद्या फाईलवर आपण सही केली नाही किंवा सदरील फाईल मी पाहिलीच नाही, अशी तकलादू कारणेही आता संबंधित कर्मचाºयाला देता येणार नाहीत. कारण ज्या टेबलवर फाईल आली आहे, त्या टेबलवरील कर्मचाºयाची डिजीटल सही संबंधित फाईलवर होणार आहे. परिणामी कामचुकारपणालाही यामुळे आळा बसणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक व गतीमान सेवा मिळावी, यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. एखाद्या नागरिकाने कामाच्या अनुषंगाने अर्ज दिल्यास व त्या अर्जावर संबंधिताचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल असल्यास त्यांना त्यांच्या अर्जाची माहिती एसएमएस किंवा मेल केली जाईल. शिवाय प्रत्येक फाईलचे स्टेटस्ही तपासता येणार आहे. जिल्हा कचेरीतील ई- आॅफीस प्रणाली जनतेच्या सोयीसाठीच आहे. ती इतर कार्यालयांमध्येही टप्प्या टप्प्याने लागू करण्यात येणार आहे.
- पी. शिव शंकर, जिल्हाधिकारी