परभणी : सेलू शहरात आढळले डेंग्यूचे आठ संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:27 AM2018-09-25T00:27:29+5:302018-09-25T00:28:50+5:30
तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
१५ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. कधी उष्ण तर कधी थंड तर कधी दमट वातावरण तयार होत असल्याने विषाणूंची वाढ होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप, अंग दुखीने नागरिक त्रस्त आहेत. यात बाल रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तापीने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी रक्त तपासणी करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत. रक्त तपासणीच्या अहवालावरुनच उपचार केले जात आहेत. शहरात चार रक्त तपासणी केंद्र आहेत. २४ सप्टेंबर रोजी या केंद्रांमधून माहिती घेतली तेव्हा ८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये थंडी, ताप, अंगावर लाल पुरळ पडणे, डोके दुखणे, उलटी, रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, अशी लक्षणे आढळतात, अशी माहिती डॉ.ऋतुराज साडेगावकर यांनी दिली.
१६ घरांमध्ये डासांच्या अळ्या
विषाणूजन्य तापाची लागण झाल्याने आरोग्य विभागाने शहरातील ४५० घरांमध्ये डेंग्यू डास निर्माण करणाऱ्या अळींची तपासणी केली, तेव्हा १६ घरांमध्ये अशा प्रकारच्या अळ्या आढळल्या आहेत. या अळ्या नष्ट करण्यासाठी अबेट औषधांचा वापर केला जात आहे.
रक्त नमुने तपासणीसाठी पाठविणार
खाजगी रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयाला दिलेल्या माहितीनुसार डेंग्यू संशयित तीन रुग्ण आढळले आहेत. इतर रुग्णालयातून याबाबत माहिती घेतली जात आहे. डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्त नमुने पुणे येथील रक्त तपासणी शाळेत पाठविले जाणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली.
फवारणीची मागणी
पावसाचा खंड पडल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नगरपालिकेने डास निर्मूलन करण्यासाठी धूर फवारणी करावी, अशी मागणी आहे.