परभणीत वीज बिल घोटाळा : अडीच महिन्यानंतर आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:15 AM2017-12-14T01:15:46+5:302017-12-14T01:15:54+5:30
महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे.
महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलापोटी महावितरण कंपनीस प्रत्येक महिन्यात रक्कम अदा केली जाते. आर.टी.जी.एस. द्वारे ही रक्कम महावितरणकडे दिली जाते. मात्र, महापालिकेतून ही रक्कम महावितरणकडे गेल्यानंतर महापालिकेच्या मीटर क्रमांकाऐवजी खाजगी व्यक्तींचे मीेटर क्रमांक टाकून मनपाच्या पैशांतून खाजगी लोकांचे वीज बिल भरल्याचा प्रकार सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकारानंतर महावितरणने चौकशी समिती नेमली.
चौकशीअंती महावितरणच्या चार कर्मचाºयांचे निलंबन केले होते. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश घोरपडे आणि महापालिकेचे कर्मचारी अब्दुल जावेद अब्दुल शकूर या दोघांनी संगनमत करुन ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सहायक अभियंता पवन पुरभा भडंगे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपेंद्र धकाते यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
त्यावरुन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक एस.ई. मालकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
१२ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव घरजाळे, अमोल वाडेकर यांनी आरोपी अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास अटक केली. इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.