परभणी : जेसीबीसाठी कर्मचाऱ्यांचा वाढला मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:46 AM2018-05-31T00:46:00+5:302018-05-31T00:46:00+5:30
तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी शेताततच मुक्काम करावा लागला. दोन मशिन चालकांनी एकूण १५ लाखांचा दंड २९ रोजी भरल्याने त्या सोडून देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी शेताततच मुक्काम करावा लागला. दोन मशिन चालकांनी एकूण १५ लाखांचा दंड २९ रोजी भरल्याने त्या सोडून देण्यात आल्या आहेत.
गौंडगाव, मैराळ सावंगी शिवारात गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्यावर जेसीबी मशिनच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने २६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी मोठ्या शिताफीने कापूस बियाणांचा प्रचार करणाºया वाहनातून प्रवास करीत वाळू धक्यावर जाऊन सिनेस्टाईल कार्यवाही केली. यावेळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा करणारी वाहने व पोकलेन मशीन पाठलाग करून पकडली. या कारवाईत पकडलेली हायवा वाहने त्याच दिवशी सोनपेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. मात्र पाठलाग करून पोकलेन मशीन गोदावरी नदीपात्रापासून चार ते पाच कि.मी. अंतरावरील शेतात पकडली. पोकलेन चालकांनी मशीन सुरु होणारे साहित्य काढून नेल्यामुळे जप्त तिन्ही जेसीबी मशीन चालू होत नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड येथील मंडळ अधिकारी, तलाठी, गौंडगावचे पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या ताब्यात या मशीन देण्यात आल्या. २६ मे रोजी पकडलेल्या या मशीन सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध झाली नाही. या मशिनला नेण्यासाठी वाहन येत असल्याच्या प्रतीक्षेत महातपुरी मंडळाचे मंडळ अधिकारी उद्धव सरोदे, तलाठी चंद्रकांत साळवे, अक्षय नेमाडे, वाकळे, सुक्रे, मुलंगे, अव्वल कारकून रघुराम जाधव, नागनाथ यरंडवाड, पोलीस पाटील व्यंकटी जाधव, सोनपेठ पोलीस ठाण्याचे सपोउपनि देवराव मुंडे, जमादार रामराव तांदळे, सुधाकर मुंडे हे २६ मे पासून २९ मे पर्यंत हातावरची सर्व कामे सोडून मशीन सांभाळण्यासाठी गौंडगाव शिवारातील कºहाळे यांच्या शेतातच तब्बल चार दिवस मुक्कामाला आहेत.
प्रत्येक मशीनला साडेसात लाख दंड
गोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करताना मिळून आलेल्या तिन्ही पोकलेन मशिनला सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचाºयांना मशीन सांभाळण्यासाठी गौंडगाव शेत शिवारातच मुक्काम ठोकावा लागला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रत्येकी एका मशीनला साडेसात लाख रुपयांचा दंड आकारल्याची व दंडाची रक्कम भरल्यास या मशीन सोडून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार जीवराज डापकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१५ लाखांचा भरला दंड
गौंडगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करताना पकडलेल्या जेसीबी मशिनला जिल्हाधिकाºयांनी प्रत्येकी साडेसात लाख रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर ३ पैकी २ जेसीबी मालकांनी १५ लाख रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाकडे जमा केला. त्यानंतर २९ मे रोजी या मशीन सोडून देण्यात आल्या.
दंड भरून सोडलेले मशीन पुन्हा वाळू धक्यावर
तहसील प्रशासनाने आकारलेला दंड भरून सोडून देण्यात आलेल्या दोन्ही पोकलेन मशीन मालकांनी आपल्या जेसीबी मशिन गौंडगाव येथील वाळू धक्यावर नेऊन ३० मे रोजी पहाटे पासून नव्या जोमात वाळू उपसा सुरू केल्याचे गौंडगाव येथील ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आले आहे.
तलाठ्यांची कामे खोळंबली
जिल्हाधिकाºयांनी पकडलेल्या तीन जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाºयांना चार दिवस शेतात मुक्काम करावा लागला. यामध्ये महातपुरी, धारासूर, सुप्पा, खळी या सज्जा अंतर्गत येणाºया शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थांना तलाठ्यांच्या शोधात गंगाखेड शहर गाठावे लागले. मात्र येथे सुद्धा तलाठ्यांची भेट न झाल्याने अनेक कामे खोळंबली होती.