परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:28 AM2019-02-27T00:28:09+5:302019-02-27T00:28:50+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे मागणाऱ्या मजुरांचा ओढा कमी असल्याचे दिसत आहे़
जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ राज्य शासनाने जिल्ह्यात पूर्णा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, या तालुक्यात दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करणे अपेक्षित आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय कोलमडला असून, शेतशिवारांमध्ये कामे शिल्लक नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतीवर अवलंबून असणाºया मजुरांनाही कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये या मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविली जाते़ ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जातात़ मजुरांनी कामाची मागणी करताच त्यांना काम उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य या विभागाचे आहे; परंतु, जानेवारी महिन्यापर्यंत रोजगार हमी योजनेकडे काम मागण्यासाठी मजूर फिरकत नसल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली होती़ ग्रामीण भागातून शहरी भागात आणि पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्येही मजुरांचे स्थलांतर वाढले होते़ ग्रामीण भागातील हे मजूर पर जिल्ह्यात कामासाठी जात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र रोहयोकडे काम मागितले जात नव्हते़ त्यामुळे या योजनेतील त्रुटी शोधण्याची वेळ प्रशासनावर आली होती़
मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने रोहयोच्या कामावर लक्ष केंद्रीत केले असून, कामांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यामध्ये जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची ८६५ कामे सुरू होती़
या कामांवर २९ हजार १६९ मजूर काम करीत होते़ त्या पुढील आठवड्यात कामांची संख्या वाढली आहे़ १४ ते २० फेब्रुवारी या काळात १ हजार ७५ कामे सुरू असून, ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत काम उपलब्ध झाले आहे़ त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ८५८ कामे सुरू असून, ३१ हजार ३३२ मजुरांना काम मिळाले तर विविध शासकीय यंत्रणांची २१७ कामे सुरू असून, त्यावर ५ हजार ११८ मजूर काम करीत आहेत़ एकंदर फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोजगार हमी योजनेकडे मजुरांचा ओढा अल्पशा प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे; परंतु, जिल्ह्यातील एकंदर दुष्काळाची परिस्थिती, रोजगाराची समस्या लक्षात घेता अजूनही मजुरांचा कल रोहयोकडे वाढत नसल्याचेच दिसत आहे़
गंगाखेड तालुक्यात वाढली कामे
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात कामे घेतली जात आहेत़ त्यात गंगाखेड तालुक्याने मोठी आघाडी घेतली आहे़ ६ ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात केवळ ७ कामे सुरू होती़ या कामांवर ३२१ मजूर काम करीत होते़ तर १४ ते २० फेब्रुवारी या आठवड्यात गंगाखेड तालुक्यात ११० कामे सुरू झाली असून, २ हजार ९३४ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़ पाथरी तालुक्यात मागील आठवड्यात केवळ १२ कामे सुरू होती़ चालू आठवड्यामध्ये या तालुक्यात ३२ कामे सुरू झाली असून, ३१५ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़