परभणी: प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:29 PM2019-08-17T23:29:56+5:302019-08-17T23:30:25+5:30
शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात पानटपऱ्या, हॉटेल, झेरॉक्स दुकान आदी टाकून नागरिकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नियमबाह्य असल्याने ते तातडीने हटविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने या संदर्भात दोन वेळा आदेश काढूनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे सर्व सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. या अनुषंगाने बांधकाम विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसाही दिल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमणधारकांनी आपापले साहित्य यावेळी उचलून नेले.