परभणी : उमेदवारी मागे घेण्यासाठी घडल्या घडामोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:10 AM2019-10-08T00:10:34+5:302019-10-08T00:10:53+5:30
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना- भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली असून बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेक दिग्गजांनी संबंधितांची मनधरणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याने प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना- भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली असून बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेक दिग्गजांनी संबंधितांची मनधरणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याने प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान कायम आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुरेश नागरे यांनी त्यांची उमेदवारी परत घ्यावी, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. यासाठी दिग्गज नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. एवढेच नव्हे तर थेट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चेनंतरही नागरे यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे नागरे यांची समजूत काढून काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांना ‘सेफ’ करण्याचे मनसुभे धुळीस मिळाले. परिणामी नागरे निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी नागरे यांनी पुरेपुर प्रयत्न केले; परंतु, शेवटच्या क्षणी रविराज देशमुख यांनी बाजी मारली. परिणामी नागरे काँग्रेसकडून दुखावल्याचे दिसून आले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. असे असताना महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. गुट्टे हे आपला अर्ज परत घेतील, अशी अपेक्षा शिवसेना व भाजपाच्या नेत्यांना होती. त्यासाठी राज्यपातळीवरुन बरेच प्रयत्न झाले; परंतु, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीच भाजपावर आरोप करुन गंगाखेडची उमेदवारी कायम ठेवल्याचे जाहीर केले. त्यामुळे गुट्टे यांचीही उमेदवारी कायम राहिली. परिणामी येथे महायुती भंग झाल्याचे पहावयास मिळाली. शिवसेनेचे बालासाहेब निरस यांनी मात्र खा.बंडू जाधव यांच्या शब्दाचा मान ठेवून उमेदवारी परत घेतली.
पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सर्वाधिक बंडखोरी झाली होती. या बंडखोरांचे बंड थंड करण्यात काही अंशी शिवसेनेला यश मिळाले. खा. बंडू जाधव यांनी यासाठी मेहनत घेतल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी थेट मुंबईहून मैदानात उतरलेले कानसूरचे डॉ.राम शिंदे यांनीही आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. शिवाय भाजपाचे अनेक वर्षापासून निष्ठेने काम करीत असताना पक्षाने आपला विचार केला नसल्याचे सांगून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पी.डी.पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपली तलवान म्यान करत उमेदवारी परत घेतली; परंतु, मुंबईत थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलेले डॉ.जगदीश शिंदे यांनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवली. डॉ.शिंदे यांनी त्यांचा अर्ज परत घ्यावा, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले; परंतु, यंदाची विधानसभा लढवायचीच, या इराद्याने त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर जाण्यास नकार दिला. परिणामी येथे सेनेची बंडखोरी कायम आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात राम खराबे यांची बंडखोरी
४जिंतूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याच्या इराद्याने गेल्या पाच वर्षापासून शिवसेनेचे जि.प.सदस्य तथा विधानसभाप्रमुख राम खराबे यांंनी तयारी चालविली होती. या अनुषंगाने त्यांनी सेलूत स्वत:चे संपर्क कार्यालय स्थापन केले. जिंतूर व सेलू या दोन्ही तालुक्यात त्यांनी सातत्याने कार्यक्रम घेतले. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात जिंतूरची जागा भाजपाकडे गेली. येथून भाजपाकडून मेघना बोर्डीकर या निवडणूक लढवित आहेत.
४त्यामुळे उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी खराबे हे त्यांचा अर्ज परत घेऊन युतीधर्म निभावतील, अशी अपेक्षा होती; परंतु, खराबे यांनी त्यात रस दाखविला नाही. खराबे हे खा.बंडू जाधव यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते.
४खा. जाधव यांचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी सौख्य आहे. लोकसभा निवडणुकीत जिंतूरने खा. जाधव यांना मोठी लीड दिली होती. त्यात माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचा मौलाचा वाटा होता. त्यामुळे खा. जाधव यांच्या शब्दाखातर खराबे निवडणुकीतून माघार घेतील, अशी चर्चा होती. त्या दृष्टीकोनातून खराबे यांची समजूत काढण्याचा पुरेपुर प्रयत्न खा.जाधव यांनी केला; परंतु, खराबे यांनी उमेदवारी परत घेतली नाही. परिणामी खराबे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.