परभणीत दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षेआधीच पेपर व्हॉटस्अॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:36 AM2018-03-14T11:36:22+5:302018-03-14T11:43:41+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेत बुधवारी विज्ञान विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अॅपवर आल्याची बाब समोर आली आहे.
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेत आज विज्ञान विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अॅपवर आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, पेपर फुटल्याच्या अफवेने गोंधळ उडाला आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने सर्वत्र १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३१ हजार ८८९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आज विज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी ११ वाजता पेपर सुरू होता. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपासूनच परभणी जिल्ह्यात व्हॉटस्अॅपवर आजचा पेपर व्हायरल झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. कोणत्या केंद्रावरुन हा पेपर व्हायरल झाला याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.
या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगिर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात आपणास माहिती नाही. परंतु तातडीने याबाबत चौकशी करतो, असे ते म्हणाले.