परभणी : वितरिकेच्या कामावर ४७२ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:09 AM2018-08-30T00:09:26+5:302018-08-30T00:10:38+5:30
पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या निम्न दूधना प्रकल्पाच्या कालवा व वितरिकेच्या कामावर आतापर्यंत तब्बल ४७२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च झाला असून, केलेली बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरू केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या निम्न दूधना प्रकल्पाच्या कालवा व वितरिकेच्या कामावर आतापर्यंत तब्बल ४७२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च झाला असून, केलेली बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरू केली आहे़
सेलू तालुक्यातील दूधना नदीवरील निम्न दूधना प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र शासनाने समावेश केला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात असला तरी या निधीतून करण्यात येणारी कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे़ २००९-१० पासून निम्न दूधना प्रकल्पाच्या कालवा व वितरिकेच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या़ आतापर्यंत वितरिका व उपवितरिकेच्या एकूण १७ कामांवर ४७२ कोटी ४० लाख ६३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ आणखी १२३ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी या कामांसाठी आवश्यक आहे़ या कामांमध्ये निम्न दूधना डावा कालवा किलोमीटर १ ते १५ वितरिका व उपवितरिका माती काम अस्तरीकरण व बांधकामे, १६ ते २७ किमी, ३७ ते ४५ किमी, ४६ ते ५५ किमी, ३६ ते ४८ किमी, १ ते १० किमी, ११ ते २५ किमी, २६ ते ४८ किमी, ११ ते २५ किमी, ४६ ते ५५ किमी, २८ ते ३२ किमी, ५६ ते ६६ किमी, ६७ ते ६९ किमी, २६ ते ३५ किमी या अंतरातील वितरिका व उपवितरिकेमधील माती काम, पेव्हर, अस्तरीकरण व बांधकामे आदी १७ कामांवर प्रारंभी ३१८ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता; परंतु, कामांमध्ये दिरंगाई झाल्याने या कामाच्या किंमतीमध्ये वाढ होवून आत्तापर्यंत हा खर्च ४७२ कोटी ४० लाख रुपयापर्यंत गेला व हा निधी निविदा काढून खर्चही करण्यात आला आहे़
आता आणखी १२३ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़ विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने काढण्यात आलेल्या या कामांच्या निविदा प्रत्येक टप्प्यावर अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, ठाणे, गंगाखेड, मुंबई येथील कंत्राटदारांना सुटल्या़ संबंधित कंत्राटदारांनी हे काम अनेक ठिकाणी केले असले तरी कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याने या वितरिकांची निकृष्ट कामे चव्हाट्यावर येऊ लागली आहेत़ या संदर्भात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आल्या; परंतु, या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे़
परभणी तालुक्यातील वडगावतर्फे पेडगाव येथील सरपंच गणेशराव ईक्कर यांनी वितरिकेच्या निकृष्ट कामाच्या फोटोंसह अनेक वेळा वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रारी केल्या़ त्यामध्ये वडगाव (ईक्कर), पिंपळगाव, एकरुखा, राजुरा, सोमठाणा, आटोळा, शिवारामध्ये उजव्या कालव्यावे व वितरिकेचे निकृष्ट काम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वितरिकेच्या कामांसाठी दूधना नदीतील व ओढ्यातील माती मिश्रीत वाळुचा वापर केला जात आहे़ त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़
पावसाच्या पाण्याने : पितळ उघडे
जिल्ह्यामध्ये २० ते २३ आॅगस्ट दरम्यान, जोरदार पाऊस झाला़ परभणी तालुक्यातील वडगाव शिवारात झालेल्या पावसामुळे निम्न दूधनाच्या वितरिकेचा कालवा फुटला़ शिवाय कालव्याच्या बांधकामास ठिक ठिकाणी तडे गेले आहेत़ या कामासाठी सिमेंट काँके्रटखाली कठीण मुरूम वापरणे आवश्यक असताना मातीचा भराव टाकून काम करण्यात आले़ येथे पाणी झिरपल्याने केलेले बांधकाम उखडले आहे़ कालव्याच्या बाजुने असलेल्या रस्त्यावर कठीण मुरूम न टाकल्याने चिखल झाला आहे़ या संदर्भात निम्न दूधनाच्या अभियंत्यांकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही, असेही या संदर्भात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात वडगावचे सरपंच ईक्कर यांनी म्हटले आहे़
कालवा परिसरात निकृष्ट वाळू साठे
निम्न दूधनाच्या परिक्षेत्रातील परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार व डिग्रस परिसरात वितरिकेची कामे करण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या वाळुचे साठे करण्यात आले आहेत़ माती मिश्रीत वाळुचा वितरिकेच्या कामासाठी वापर केला जात असल्याने केलेले काम टिकत नाही़
या संदर्भात कुंभारी व डिग्रस येथील शेतकºयांनीही जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली; परंतु, या तक्रारीचीही अद्याप साधी चौकशीही झालेली नाही़ त्यामुळे तक्रार करून तरी उपयोग काय? असा सवाल या भागातील शेतकरी मारोती ईक्कर यांनी उपस्थित केला आहे़