परभणी : पाण्याअभावी वृक्ष लागवड मोहिमेला बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:49 PM2019-04-12T23:49:00+5:302019-04-12T23:51:47+5:30
वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासन गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षीच्या जून महिन्यात ३४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या वृक्षांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली.
सध्या तर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या झाडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २२ विभागांनी लावलेल्या ३४ लाख झाडांपैकी बहुतांश रोपटे जळून गेली आहेत.
शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज
४ राज्य शासन दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवून वृक्ष लागवड करीत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते; परंतु, एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षाला पाणीपुरवठा केला जात नाही, तशी तरदूतही या योजनेत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील झाडे जगविण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.