परभणी : घाटांच्या लिलावामुळे वाळूच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:34 PM2019-04-09T23:34:34+5:302019-04-09T23:34:58+5:30

जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Parbhani: Falling in sand due to auctioned auction | परभणी : घाटांच्या लिलावामुळे वाळूच्या भावात घसरण

परभणी : घाटांच्या लिलावामुळे वाळूच्या भावात घसरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गोदावरी, दुधना आणि पूर्णा या प्रमुख नद्यांवर जिल्ह्यात सुमारे ५३ वाळूघाट आहेत. गोदावरी नदीच्या वाळूला मराठवाड्यात मागणी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी मोठी स्पर्धा लागते. मात्र गतवर्षी वाळू घाटांचे लिलाव करण्यास हरित लवादाने परवानगी न दिल्याने तब्बल वर्षभरापासून जिल्ह्यातील वाळूचा अधिकृत उपसा बंद आहे. परिणामी खुल्या बाजारपेठेत वाळू मिळत नसल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम व्यवसाय आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले.
वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तरी गोदावरी, पूर्णा या नदीच्या पात्रातून वाळूची चोरी थांबली नव्हती. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा उपलब्ध नसतानाही काही भागातून अनधिकृतरीत्या वाळूची विक्री केली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होत होती. वाळू उपलब्ध नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळूची विक्री केली जात होती. परिणामी जिल्ह्यातील बांधकामे वाळू अभावी ठप्प पडली होती.
दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरु केली. त्यापैकी ११ वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून ९ वाळूघाट सद्यस्थितीला अधिकृत वाळू उपसा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे वाळूच्या किंमतीही घसरल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी २० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात होती. सद्यस्थितीला अधिकृत वाळू घाटावरुन १६ हजार रुपयांना तीन ब्रास वाळू विक्री केली जात आहे. वाळूच्या भावात ४ हजार रुपयांची घसरण झाली असून लिलावात सुटलेल्या घाटांची संख्या वाढल्यानंतर हे भाव आणखी कमी होतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
एकंदर तब्बल वर्षभरानंतर वाळूच्या भावात घसरण झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून रखडलेली बांधकामे पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
या ठिकाणाहून वाळू उपशाला सुरुवात
४मानवत तालुक्यातील पार्डी, कुंभारी, वांगी, पालम तालुक्यातील रावराजूर, पाथरी तालुक्यातील मुद्गल, सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी, देऊळगाव आणि मानवत तालुक्यातील सावंगी मगर.
आणखी तीन घाटांची प्रक्रिया सुरु
४जिल्हा प्रशासनाने ३३ वाळूघाट लिलावासाठी ठेवले असले तरी प्रत्यक्षात १२ घाटांचाच लिलाव सुरु झाला आहे. त्यापैकी ९ वाळूघाट मालकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने हे घाट निविदाधारकांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रत्यक्ष वाळूच्या उपशाला सुरुवात झाली आहे. मात्र पालम तालुक्यातील गुंज, पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या आणि सेलू तालुक्यातील डिग्रस खु. या वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाले असले तरी निविदाधारकांनी अद्यापपर्यंत काही करांचा भरणा केला नाही. त्यामुळे या वाळूघाटातून प्रत्यक्षात वाळू उपसा सुरु झालेला नाही. कर भरुन घेतल्यानंतर लवकरच हे वाळू घाटही निविदाधारकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
परभणी जिल्ह्यात वाळू घाटांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जास्तीत जास्त वाळूघाट लिलावात काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले तर वाळूची निर्माण झालेली टंचाई दूर होऊ शकते. तसेच बाजारपेठेत मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध होऊन सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात वाळू मिळू शकेल.
वाळू घाटाचा लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलावधारकाला किमान ३ सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या प्रमुख रस्त्यावर १, वाळू भरण्याच्या भागातील जागा दिसेल या पद्धतीने २ असे तीन कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाळूचे उत्खनन मजुरांमार्फतच करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा आणि वाळू उपशाला लगाम लागला आहे.

Web Title: Parbhani: Falling in sand due to auctioned auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.