परभणी: आठ गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:08 AM2019-08-25T00:08:51+5:302019-08-25T00:09:08+5:30
पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.
पूर्णा तालुक्यातील फुकटगाव, खुजडा, कान्हडखेड, हाटकरवाडी, कान्हेगाव, गणपूर, सुकी, ममदापूर या गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान किसान योजनेंतर्गत २ हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. मात्र याच गावांमधील २० टक्के शेतकºयांच्या खात्यावर या योजनेंतर्गत दोन हप्ते जमा झाले आहेत. बहुतांश शेतकºयांना योजनेच्या अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी उसणवारी करुन पेरण्या केल्या आहेत. पावसाने ताण दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक आहे. अनेक भागात पिकांवर किडीचा प्रादूर्भाव होत असल्याने महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.
त्यातच शेतकरी अनुदान मिळत नसल्याने या शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकºयांनी पूर्णेच्या तहसीलदारांकडे धाव घेतली असून वरील आठही गावांमधील वंचित शेतकºयांच्या खात्यावर शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पहिला हप्ता जमा करावा, अशी मागणी केली आहे.
पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा
एकीकडे अनुदान न मिळाल्याने शेतकºयांमध्ये उदासीनता असतानाच दुसरीकडे निसर्गही साथ देत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. सद्यस्थितीला पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. मात्र पावसाने १५ दिवसांपासून ताण दिला असून पिके कोमेजून जात आहेत.
पोळा सणापूर्वी अनुदान द्या
शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला पोळ्याचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या खरीप हंगामातून शेतकºयांना एकाही पिकातून अद्यापपर्यंत आर्थिक लाभ मिळाला नाही. मूग, उडीद ही पिके कमी कालावधीत हाती येतात. पोळ्यापूर्वी मूग आणि उडदाचे खळे होऊन शेतकºयांना आर्थिक हातभार लागतो. मात्र यावर्षी पावसाअभावी दोन्ही पिकांचे उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे पोळ्याचा सण कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहे. तेव्हा पोळा सणापूर्वी शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर माणिका बोखारे, भीमराव बोखारे, सीताराम बोखारे, बाबुराव बोखारे, गंगाधर बोखारे, मारोती बोखारे, उपसरपंच यशवंत बोखारे आदींची नावे आहेत.