परभणी : जायकवाडीच्या पाण्याच्या अनिश्चिततेने शेतकरी पेचात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:20 AM2018-12-23T00:20:09+5:302018-12-23T00:20:56+5:30
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे.
पाथरी तालुक्यातील रबी हंगामातील दहा हजार हेक्टर सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, रबी हंगाम संपत आला तरीही अद्याप डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. यापूर्वी सोडण्यात आलेल्या संरक्षित पाणीपाळीमध्ये चार हजार हेक्टर खरीप हंगामातील पिकांचे सिंचन करण्यात आले. यावर्षी पाथरी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आॅक्टोबर महिन्यापासून भुगर्भातील पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पावसाळ्यामध्ये दोन महिने पाऊस पडला. उर्वरित दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे या भागात खरीप हंगामातील पिकांना उतारा आला नाही. तर पावसाअभावी पाणीपातळी खालावल्याने या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. राज्य शासनाने पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ परिस्थितीवर या भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आठ आवर्तन सोडण्याची मागणी सुुरुवातीपासूनच करण्यात आली आहे. गोदापात्रातील ढालेगाव आणि मुदगल येथील दोन्ही बंधारे मृत साठ्यावर येऊन ठेपले आहेत.
या बंधाºयातून शेतकºयांनी सुरुवातीला सिंचनासाठी पाणी उपसा सुरू केला होता. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने शेतीसाठी होणाºया पाणी उपशावर निर्बंध घातले आहेत. गोदावरी पात्रातील बंधाºयावर टाकण्यात आलेल्या कृषीपंपाची वीज जोडणी महसूल यंत्रणेने तोडली आहे.
पाथरी तालुक्याचा अर्धा अधिक भाग जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर येतो. यावर्षी जायकवाडी धरणात वरच्या धरणातील पाणी सोडले असले तरी सद्य स्थितीत २४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी सुरुवातीपासूनच केली जात आहे.
साधारणत: पाथरी उपविभागांतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. मात्र सध्या जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सोडण्यात येणाºया पाण्याची अनिश्चितता कायम आहे. जायकवाडी धरणातून आॅक्टोबर महिन्यात दीड महिना संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. पाथरी उपविभागात ४ हजार हेक्टर सिंचन झाले. ऊस, कापूस, ज्वारी आणि गहू पेरणीसाठी याचा लाभ झाला.
सध्या ही पिके बहरात आहेत. आता या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, अद्यापही पाणी सोडण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्या शेतकºयांनी जायकवाडी कालव्यातील पाण्याच्या भरोशावर रबी हंगामातील पेरणी केली आहे. ते शेतकरी पेचात सापडले आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी शेतकºयातून होत आहे.
बैठकीला मिळेना मुहूर्त
जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय होतो. मात्र मागील दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठक झालीच नाही. जलसंपदामंत्री यांच्या उपस्थितीमध्ये १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक काही कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे सल्लागार समितीला बैठकीसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.