परभणी : शहापूर ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:12 AM2019-02-14T00:12:50+5:302019-02-14T00:14:02+5:30
सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुलाचा लाभ तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी १३ फेब्रुवारीपासून तालुक्यातील शहापूर येथील ९६ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुलाचा लाभ तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी १३ फेब्रुवारीपासून तालुक्यातील शहापूर येथील ९६ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनस्तरावर मोठे प्रयत्न चालू आहेत. शहापूर येथील सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वसामान्य नागरिकांचा सर्व्हे करुन त्यांना हक्काचे घरकुल देण्याचे सांगण्यात आले होते; परंतु, सर्व्हे करुन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही ग्रामस्थांना अद्यापपर्यंत लाभ देण्यात आला नाही.
त्यामुळे ९६ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर बंडू देशमुख, उपसरपंच जयश्री देशमुख, बाळासाहेब ढवळे, हरिभाऊ मोरे, भगवान सुरवसे, माणिक मांडगे, रघुनाथ सुरवसे, अशोक चव्हाण, अशोक देशमुख, संतोष जाधव, राजेश्वर देशमुख, बबन मोरे, किर्तीकुमार बुरांडे, कालिदास मगर, हरिभाऊ मोरे आदींसह ९६ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.