परभणी : गंगाखेड रस्त्याचे अखेर भाग्य उजळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:20 AM2017-12-10T00:20:34+5:302017-12-10T00:20:44+5:30
फक्त खड्ड्यांचाच रस्ता म्हणून राज्यस्तरावर कुप्रसिद्ध झालेल्या परभणी- गंगाखेड रस्त्याचे भाग्य उजळले असून या रस्त्यासाठी तब्बल २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत करावयाच्या ३५ कि.मी. रस्ता कामाच्या निविदाही शनिवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून या अनुषंगाने ५ जानेवारी नवी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : फक्त खड्ड्यांचाच रस्ता म्हणून राज्यस्तरावर कुप्रसिद्ध झालेल्या परभणी- गंगाखेड रस्त्याचे भाग्य उजळले असून या रस्त्यासाठी तब्बल २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत करावयाच्या ३५ कि.मी. रस्ता कामाच्या निविदाही शनिवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून या अनुषंगाने ५ जानेवारी नवी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी- गंगाखेड या ४५ कि.मी. रस्त्यावर खड्डा नाही, अशी एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे परभणीहून गंगाखेडला किंवा गंगाखेडहून परभणीला येण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासांचा वेळ वाहनधारकांना लागतो. या रस्त्यावरील खड्ड्यांना त्रासून अनेकांनी वाहनाद्वारे प्रवास करणे टाळून रेल्वेची वाट धरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेकवेळा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क या रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस हायवे’ असे नामकरण केले होते. गेल्या महिन्यातच जिल्ह्याच्या दौºयावर आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावात या रस्त्याऐवजी जिंतूर- परभणी या रस्त्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हावासियांच्या संतापामध्ये भर पडली होती. त्यामुळे गंगाखेड-परभणी रस्ता केंद्र आणि राज्यसरकारचा कालावधी संपेपर्यत होणार की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या रस्त्यासाठी तब्बल २०२. ७९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या अनुषंगाने ३५.८८५ कि.मी. रस्ता कामाची निविदा केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे आता भाग्य उजळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग सेक्शनस्मध्ये विकसन, अद्ययावतीकरणाअंतर्गत या रस्त्याचे काम इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन कॉट्रक्टद्वारे करण्यात येणार आहेत. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचा कालावधी असून त्यापुढील चार वर्षे केलेल्या कामाची देखभाल व दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराला करावयाची आहे. या कामाच्या निविदा ११ ते २४ डिसेंबरपर्यंत दाखल करावयाच्या असून निविदा पूर्व बैठक ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता नवी मुंबई येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्या कक्षात होणार आहे. दाखल करण्यात आलेल्या निविदा २९ जानेवारी रोजी उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे या कामासाठी कंत्राटदार निवडला जाणार आहे. त्यामुळे आता या परभणी- गंगाखेड रस्ता कामाच्या निधी व निविदेचा प्रश्न निकाली निघाला आहे. निविदा सुटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी हे काम कधी सुरु होईल, या विषयी परभणीवासियांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. निविदेमध्ये रस्ता कामाचा कालावधी दोन वर्षाचा नमूद केला असला तरी केवळ ३५ कि.मी.चे हे काम असल्याने अत्याधुनिक पद्धतीचा वापर करुन दर्जात कुठलीही तडजोड न राखता हे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे.
पाथरी- सेलू -देवगावफाटा रस्त्यासाठी २१७ कोटी
परभणी- गंगाखेड रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असताना आता पाथरी- सेलू- देवगाव फाटा या ४२.७०० कि.मी. रस्त्याचा प्रश्नही निकाली लागला आहे. या रस्ता कामाच्याही २१७.४१० कोटी रुपयांच्या निविदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रायलयाने काढल्या आहेत. गंगाखेड रस्त्यासोबतच या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याही २४ जानेवारीपर्यंत दाखल करावयाच्या आहेत. २९ जानेवारी रोजी दाखल निविदा उघडल्या जाणार असून त्यानंतर या रस्ता कामाचा कंत्राटदार निश्चित होणार आहे. पाथरी- सेलू- देवगावफाटा हा रस्ता झाल्यानंतर पाथरी- सेलूमार्गे औरंगाबादचे व विदर्भात जाण्याचे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.