परभणी: फौजदार बाबू गिते, भालेराव यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:20 PM2019-07-06T23:20:57+5:302019-07-06T23:21:18+5:30
जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी खाजगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्या प्रकरणी फरार असलेले सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते व शिपाई गौतम भालेराव यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी खाजगी व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्या प्रकरणी फरार असलेले सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते व शिपाई गौतम भालेराव यांना शनिवारी पोलिसांनीअटक केली.
वाळू भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी मशीनवर कारवाई न करता सोडून देण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागून ती २० जून रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते, पोलीस शिपाई गौतम भालेराव यांनी स्वीकारली होती. त्यानंतर ते परळीच्या दिशेने पळून गेले होते.
या प्रकरणी त्यांच्यासह खाजगी व्यक्तीविरुद्धही गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेसपासून पोलीस उपनिरीक्षक गिते, भालेराव व खाजगी व्यक्ती लक्ष्मण फड हे फरार होते. तिन्ही आरोपींनी गंगाखेड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु, न्यायालयाने तो फेटाळल्याने ६ जुलै रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात ते हजर झाले. त्यानंतर त्यांना गंगाखेड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.