परभणी : खिळखिळ्या बसमधून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:52 AM2019-01-09T00:52:12+5:302019-01-09T00:52:19+5:30
या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याचे चित्र गंगाखेड आगारातील बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व संतांची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या गंगाखेड आगारातून दररोज २ शिवशाही व इतर ५६ बस अशा एकूण ५८ बसमधून मुंबई, पुणे, शेगाव, नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद आदी लांबपल्यासह प्रवाशांच्या इच्छुक स्थळी ने-आण केल्या जात आहे. यातील २ शिवशाही बस वल्लभनगर, ४ एशीयाड बस, मुंंबई व नाशिक मार्गावर तर परिवर्तन लालपरी बस पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, शेगाव मार्गावर धावत आहेत.
गंगाखेड, पालम व सोनपेठ या तीन तालुक्यांसाठी मिळालेल्या १९ मानव विकासच्या बस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर तसेच लातूर, परभणी, नांदेड मार्गावर धावत आहेत. गंगाखेड आगारात असलेल्या बस इतर आगारातील रस्त्यावर चालवून नंतर या आगारात आल्याने या बसची दुरवस्था झाली आहे.
यातील काही परिवर्तन लालपरी बसच्या खिडक्यांची तावदाने निखळून पडले, आसन तुटले आहेत. तर काही बसच्या टपावरील बाजूने लावलेला पत्रा कापला गेल्याने खिळखिळ्या झालेल्या या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत.
बसची झालेली दुरवस्था पाहून मोडकळीस आलेल्या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांचा जीव खालीवरी होत असून प्रवाशांच्या नजरा एकटक फाटलेल्या पत्र्यावर राहत आहेत. आपले स्थानक कधी येईल आणि आपण बसमधून इच्छुक स्थळी कसे सुरक्षित पोहचू हा विचार व भिती प्रवाशांच्या मनात घोळत आहे. इच्छुक स्थळी स्थानकात बस पोहचताच मोठ्या संकटातून सुटका झाल्यासारखे प्रवासी घाईगडबडीत बसमधून उतरताना दिसत आहेत.
गंगाखेड आगारातील बसेसची दुरवस्था झाल्याने व गेल्या चार वर्षांपासून दोन शिवशाही बस वगळता नवीन एकही बस आगाराला मिळाली नाही. आगारातून पंढरपूर व औरंगाबाद मार्गावर धावणाºया बसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या असल्याचे आगारातील कर्मचाºयातून बोलल्या जात आहे. त्यामुळे याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरटीओ : कार्यालयाकडे पाठविणार बस
४गंगाखेड आगारातील तीन बसची अवस्था खूपच बिकट झाल्याचे मान्य करीत मोडकळीस आलेल्या तीनही बसेस लवकरच आरटीओ कार्यालयाकडे पासिंगसाठी पाठविल्या जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे बसची दुरवस्था होऊन त्या खिळखिळ्या होत असल्याचे ते म्हणाले.
भंगार बसमुळे विद्यार्थी संतापले
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात मानव विकास मिशनतंर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी भंगार गाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पालम तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेत येण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनंतर्गत ७ बसगाड्या गंगाखेड आगाराला दिल्या आहेत. या बसमधून विद्यार्थिनींना मोफत प्रवास तर प्रवाशांकडून भाडे आकारून ते महामंडळाला उत्पन्न म्हणून दिले जाते. महामंडळाकडून मानव विकास मिशनच्या नवीन बस ग्रामीण भागात न पाठविता इतर ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी पाठविल्या जात आहेत.
विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी गंगाखेड आगार, आतील भागात भंगार झालेल्या बसगाड्या ग्रामीण भागात पाठवत आहे. या बस अतिशय खराब झाल्या आहेत. बसमधील आसन व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. तर बसचा पत्रा जागोजागी चिरून गेला आहे.
खराब झालेल्या बसमधून प्रवास करताना विद्यार्थिनींना धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे फळा येथे नेहमीच भंगार बसगाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात असून मानव विकास मिशनंतर्गत खरेदी केलेल्या बस मुलींच्या प्रवासासाठी वापराव्यात, अशी मागणी पालम तालुक्यातून होत आहे.
गंगाखेड आगारातील बसने गंगाखेड ते लोहा असा प्रवास केला. बसच्या मध्यभागापासून फाटलेला पत्रा व तुटलेली आसन व्यवस्था त्याच बरोबर धावत्या बसमध्ये खालीवरी होणारा पत्रा, बसमध्ये बसून पाहताना लोहा स्थानकापर्यंत आपण सुरक्षित पोहचतो की, नाही? अशी भिती वाटत होती. नादुरुस्त झालेल्या बस तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात.
-भगवानराव ठुले, प्रवासी