परभणी : भर रस्त्यावरुन पळविले पन्नास हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:05 AM2018-05-23T00:05:45+5:302018-05-23T00:05:45+5:30
बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.
येथील व्यापारी सय्यद जैनू सय्यद युसूफ यांनी सोमवारी सकाळी स्टेट बँक आॅफ इंडिया येथील खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हे पैसे एका थैलीत टाकून ते सायकलवरुन घरी जात असताना डॉ.हेडगेवार चौक परिसरात चोरट्यांनी सायकलला अडकविलेली थैली हिसका देऊन पळविली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच सय्यद जैनू यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचीच उलट तपासणी केली. बँकेतून खरेच पैसे काढले का, असे विचारत पैसे काढण्यासाठी भरुन दिलेली पावती बँकेतून आणण्याचे सांगितले व पावती मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करु, असे सांगून साधा तक्रार अर्ज लिहून घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नाही.
तक्रार नोंदविण्यातच पोलिसांची धन्यता
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी होणाºया चोºयांबरोबरच भर दिवसाही लुटमारीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन मात्र गुन्हे नोंदविण्याऐवजी केवळ तक्रार घेऊन तक्रारकर्त्याची बोळवण करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावत आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायाधीशांच्या निवासस्थानासह पाच घरे फोडल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी देखील शहरात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
सोमवारी एका व्यापाºयाचे ५० हजार रुपये पळविल्याची घटना घडल्यानंतरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. यापर्वूी ८ फेब्रुवारी रोजी भंडारी कॉलनीतील उमदाबी शेख करीम यांच्या अंगावर घाण पडल्याचे सांगून त्यांच्याकडील ३० हजार रुपये पळविल्याची घटना घडली होती. चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैदही झाला होता. परंतु, पोलिसांनी त्यावेळेसही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.
मोबाईल चोरीचे प्रकार
गंगाखेड शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक बाजाराच्या दिवशी मोबाईलच्या चोरी होत आहेत. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ तक्रार अर्जच घेतले जातात. त्यामुळे चोरीच्या तपासाकडे दुर्लक्ष होत आहे.