परभणी : महिलेच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:53 AM2018-05-27T00:53:14+5:302018-05-27T00:53:14+5:30
कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी : कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
जिंतूर तालुक्यातील कोठा परिसरातील सवडनाईक तांडा येथील डिगांबर चव्हाण यांची मुलगी रंजना चव्हाण हिचा विवाह रामा ऊर्फ रामेश्वर राठोड (रा.शिवाची वाडी) याच्यासोबत २० मे २००२ रोजी झाला होता. मात्र सासरची मंडळी वारंवार त्रास देत असल्याने रंजना हिने २००८ मध्ये तिच्या पतीविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर ती आपल्या मुलांसह वडिलांकडेच राहत होती. काही महिन्यांतच रामेश्वर राठोड याने दुसरा विवाह केला. या संदर्भातील तक्रारही बामणी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र सासरच्या मंडळीने मे महिन्यात आपसात मिटवून घेऊन रंजनाला परत सासरी नेले. मात्र सासरी तिला पुन्हा तिला त्रास दिला जावू लागला. १७ मे रोजी रंजना हिला विष पाजले. उपचार घेत असताना २१ मे रोजी तिचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. डिगांबर चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पती रामा ऊर्फ रामेश्वर राठोड, सासरा फुलचंद हरदास राठोड, सासू अनुसया फुलचंद राठोड, श्रीराम फुलचंद राठोड, सुरेखा रामा राठोड, निर्मला श्रीराम राठोड, कविता आसाराम राठोड, दलसिंग हरदास राठोड, माणिक हरदास राठोड, आसाराम फुलचंद राठोड यांच्याविरुद्ध २५ मे रोजी रात्री बामणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि. विजय रामोड तपास करीत आहेत.