परभणीच्या खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल, जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:54 AM2018-01-02T03:54:07+5:302018-01-02T03:54:13+5:30
नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमाची तयारी सुरू असताना जुन्या राजकीय वादातून जबर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्यासह इतरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमाची तयारी सुरू असताना जुन्या राजकीय वादातून जबर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्यासह इतरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुस-या गटातील सहा जणांवर जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंद झाला. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काद्राबाद प्लॉट येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम घेण्याची तयारी सुरू होती. यासाठी दिनेश राठोड यांच्या घरातून वीज कनेक्शन घेऊन होम थिएटर लावायचे होते. यावेळी मी गल्लीत उभा असताना पाठीमागून येऊन आरोपींनी माझे हात धरले. खा.बंडू जाधव यांनी गाडीतून उतरुन तलवार बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मी हा वार हुकविला. मात्र गालावर वार बसल्याने जखमी झालो,अशी तक्रार वसंत मुरकुटे याने दिली आहे.
दुसºया गटातील विठ्ठल निवृत्ती कांबळे यांच्या तक्रारीवरून वसंत मुरकटे, गणेश मुरकटे, धीरज निर्मले व त्याचा लहान भाऊ, प्रशांत मुरकुटे आणि गोट्या मुरकटे अशा सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.