परभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आले अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:09 AM2019-11-10T00:09:15+5:302019-11-10T00:09:35+5:30
परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील मुदखेड ते मनमाड या दरम्यान रेल्वे मार्गाचा दुहेरीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प रेल्वे प्रशासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत परभणी ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास प्रत्यक्ष प्रारंभ झाला असून त्यापैकी परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण होऊन या मार्गाचा वापरही सुरु झाला आहे. याच मार्गावरील मिरखेलपासून ते मुदखेडपर्यंतचे दुहेरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या मार्गावरील मोठे पूल वगळता जवळपास सर्व पुलांची उभारणी झाली आहे. रेल्वे मार्गावर रेल्वे पटरी अंथरण्याचे कामही गतीने सुरु आहे. या कामाची गती पाहता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
परभणी ते मुदखेड या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मागील तीन वर्षात २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. २०१२-१३ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली. ३९० कोटी ६० लाख रुपये खर्चाचा प्रकल्प असून एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत ५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या मिरखेल ते मुदखेड दरम्यान ही कामे सुरु आहेत. त्यामध्ये मिरखेल ते लिंबगाव ३०.९० कि.मी. आणि मालटेकडी ते मुगट १० कि.मी. असे ४१ कि.मी.अंतराचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सद्यस्थितीला दुहेरीकरणासाठी लागणाºया लागणाºया सर्व प्रमुख बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जमीन संपादन, केबल टाकणे, मोठ्या आणि छोट्या पुलांचे बांधकाम, रिले रुमस्, केबीन आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामार्गावरील सर्व स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उंच प्लॅटफॉर्म, बँचेस्, पाण्याची सुविधा ही कामेही पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिली.
दुहेरी मार्गाचा वापर सुरु
परभणी ते मुदखेड या मार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात असले तरी काही स्थानका दरम्यान हे काम पूर्ण झाल्याने त्या ठिकाणाहून दुहेरी मार्गाचा वापर सुरु झाला आहे.
४त्यामध्ये परभणी ते मिरखेल हा १७ कि.मी. अंतराचा मार्ग जून २०१७ पासून वापरात येत आहे. तर मुगट ते मुदखेड या ९.३ कि.मी.अंतराचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले.
४लिंबगाव-नांदेड- मालटेकडी १४.१० कि.मी.अंतराच्या दुहेरीकरणाचे कामही पूर्ण झाले असून १७ आॅक्टोबर २०१८ पासून हा दुहेरीमार्ग वापरला जात आहे.
रेल्वेगाड्यांची वाढणार गती
४परभणी ते मुदखेड या अंतरादरम्यान दररोज ७० ते ८० रेल्वेगाड्या धावतात. या सर्व रेल्वेगाड्या सध्या एकेरी मार्गावरुन धावतात. दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच या गाड्यांचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीमध्ये अमूलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नांदेड विभागासाठी महत्त्वपूर्ण असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
पूर्णा पुलाच्या कामाला गती
४या रेल्वेमार्गावर पूर्णा नदीवरील रेल्वेचा पूल हा सर्वात मोठा पूल आहे. या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून रेल्वे पटरी अंथरण्यासाठी सध्या भराव टाकण्याचे काम सुरु आहे. त्याच प्रमाणे लिंबगाव जवळ मोठा भूयारी पूल उभारला जात असून त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सुरक्षे यंत्रणेमार्फत चाचणी घेतली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणेचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.