परभणी : अखेर भुयारी रेल्वे पुलाच्या प्रश्नावर निघाला तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:42 PM2019-06-08T22:42:42+5:302019-06-08T22:43:22+5:30
पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़
पेडगाव, गव्हा, मोहपुरी, आळंद, पान्हेरा, देवलगाव आवचार, भोगाव साबळेसह १५ ते २० गावांची वाहतूक असलेल्या रेल्वेच्या भुयारी पुलामध्ये पाणी साचत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती़ पावसाळ्यामध्ये हा प्रश्न जटील होणार असल्याने राकाँचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता़ प्रशासनाने दखल घेऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांसमवेत चर्चा घडवून आणली़ यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर, राकाँचे संतोष देशमुख, प्रा़ किरण सोनटक्के, प्रा़ सुरेंद्र रोडगे, मनोज राऊत, सुमंत वाघ, अंबादास सुरवसे, आबासाहेब तायनाक, नवनाथ मेटे, अंबादास मेटे, श्रीधर पाते, बालासाहेब देशमुख आदी उपस्थित होते़
तीन तास चर्चा
रेल्वेच्या भुयारी प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये तीन तास चर्चा झाली़ रेल्वे प्रशासनाचे जालना विभागाचे सुधाकरन, सेक्शन इंजिनिअर हरिशकुमार यांची उपस्थिती होती़ सामान्य नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाने कामे करू नयेत, असे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सुनावले़ त्यानंतर पर्यायी रस्ता तयार करून देणे आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा काढण्यात आला़