परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:20 AM2018-12-22T00:20:22+5:302018-12-22T00:20:35+5:30
वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.
गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून विना परवाना वाळुचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २६ गाढवांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. यावेळी गाढवांचे मालक मात्र फरार झाले. त्यामुळे या सर्व गाढवांना धारखेड ग्रामपंचायतीच्या आवारात बांधून ठेवण्यात आले. यातील एक गाढव कारवाईच्या दिवशीच दगावले. गाढवांना पकडून दहा दिवसांंचा काळ उलटला तरी या गाढवांवर मालकी हक्क दाखविणारे गाढवांचे मालक अथवा इतर कोणीही समोर आले नाही. शेवटी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, लिपिक सुरेश डिलोड, सरपंच यशोदा चोरघडे, ग्रामसेवक ज्ञानोबा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाढवांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात आठ जणांनी सहभाग घेतला. मात्र प्रति गाढव ५०० रुपये या प्रमाणे केवळ तिघांनीच पैसे भरल्याने उर्वरित पाच जणांना बोली लावता आली नाही. महसूल प्रशासन पकडलेल्या गाढवांचे मालक समोर आले असते तर त्यांना समज देऊन, दंड आकारून वाळू तस्करीला आळा घालता आला असता; परंतु, गाढवांचे मालक समोर आले नाहीत. त्यामुळे वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करणारे कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
७६ हजार रुपयांचा मिळाला महसूल
महसूल प्रशासनाने या गाढवांचा लिलाव करण्याचे ठरविल्यानंतर प्रति गाढव ३ हजार रुपये या प्रमाणे शासकीय बोलीवर ५० रुपये बोली लावून सय्यद वसीम सय्यद दिलावर यांनी १५ हजार २५० रुपयांचे १५ गाढवं खरेदी केले. बाळासाहेब केरबा भालके यांनी शासकीय बोलीवर १० रुपये वाढ करून ३ हजार १० रुपयाप्रमाणे १५ हजार ५० रुपयांची पाच गाढवे खरेदी केली.
सय्यद आसेफ सय्यद अकबर यांनी ३ हजार ५० रुपया प्रमाणे ४५ हजार ७५० रुपयांची १५ गाढवं खरेदी केली. वाळू तस्करीतून मिळालेल्या २५ गाढवांच्या लिलावातून तहसील प्रशासनाला ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावेळी सखाराम चोरघडे, शेख युनूस, दिगंबर चोरघडे, सुदाम टोलमारे, नंदकुमार भालके, भास्कर बोबडे, सय्यद युनूस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगाखेड तालुक्यात वाळूची वाहतूक करणाºया गाढवांचा लिलाव करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात वाळू वाहतूक करायला लावणारे मालक मात्र सापडले नाहीत. त्यामुळे यापुढेही गाढवांच्या साह्याने वाळूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाढवांच्या मालकांना शोधण्याचे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे.